Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

धामणपेठ गावात अतिसाराने तिघांचा मृत्यू; तिघांवर उपचार सुरू chandrapur gondpipari

गोंडपिपरी:- प्राथमिक आरोग्य केंद्र, धाबा अंतर्गत मौजा धामणपेठ या गावात अतिसारग्रस्त रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. अतिसाराची लागण झाल्याने या गावात बापूजी धुडसे (६५), अनसूया सरवर (७२) व गंगाराम मडावी (५५) या तीन जणांचा मृत्यू झाला तर तीन रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
धामणपेठ या गावात एकच हातपंप आहे. या हातपंपाचे दूषित पाणी प्यायल्याने गावातील नागरिकांना अतिसाराची लागण झाली. त्यापैकी धुडमे, सरोवर आणि मडावी या तिघांचा मृत्यू झाला.
७ सप्टेंबर रोजी बाह्यरुग्ण तपासणीमध्ये एकूण २१ रुग्ण तर ८ सप्टेंबर रोजी एकूण ११ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर रुग्णांवर शिबिरामध्येच औषधोपचार करण्यात आला. सद्यस्थितीत रुग्णांची संख्या नियंत्रणात असून गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांचे ५ पाणी नमुने, १ ब्लिचिंग पावडर नमुना तसेच ८ रुग्णांचे शौच नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठवण्यात आले आहे.
आरोग्य विभागामार्फत गावामध्ये आरोग्य शिबिरे घेतली जात आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी प्रत्यक्ष भेट देऊन गावातील परिस्थितीची पाहणी केली, तसेच मृत रुग्णांच्या घरी जाऊन भेट दिली.
यावेळी आरोग्य विभागाच्या चमूला साथरोग नियंत्रणाबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. रुग्णांची आरोग्य तपासणी गावातील अंगणवाडी केंद्रातील आरोग्य शिबिरात केली जात आहे. तेथेच औषधोपचारही सुरू आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत दैनंदिन गृहभेटी देऊन सर्वेक्षण करण्यात येत असून नागरिकांना आरोग्य शिक्षण दिले जात आहे.
आतापर्यंत गावातील एकूण १२० घरी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणून 'जीवन ड्रॉप बॉटल'चे वाटप करण्यात आले. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, घरामध्ये व परिसरात स्वच्छता ठेवावी, आहारामध्ये तिखट व मसालेदार पदार्थ खाणे टाळावे, संतुलित आहार घ्यावा, घाबरून न जाता लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत