राज ठाकरे यांचे १८ सप्टेंबरपासून "मिशन विदर्भ" #chandrapur


नागपूर, चंद्रपूर व अमरावती महापालिकेवर फोकस
नागपूर:- मनसेला विदर्भात उभारी देण्यासाठी, कार्यकर्त्यांची मोट नव्याने बांधण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता 'मिशन विदर्भ' हाती घेतले आहे. येत्या १८ सप्टेंबर रोजी ते नागपुरात दाखल होणार असून तब्बल ६ दिवस विदर्भात तळ ठोकणार आहेत. नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीन महापालिकांवर विशेष फोकस केले जाणार असून या तीन शहरांत राज ठाकरे हे कार्यकर्त्यांच्या बैठका व व्यक्तिगत भेटीगाठी घेणार आहेत.
राज ठाकरे यांच्या या प्रस्तावित दौऱ्याची तयारी सुरू झाली आहे. मंगळवारी मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी नागपुरात येत रवी भवनची पाहणी केली. राज यांच्यासाठी रवी भवन येथील ९ नंबरचा बंगला राखीव ठेवण्यात आला आहे. राज ठाकरे हे १८ व १९ सप्टेंबरला नागपूरला मुक्कामी असतील. त्यानंतर २० रोजी चंद्रपूर येथे मुक्काम असेल. २१ आणि २२ रोजी ते अमरावती येथे मुक्कामी असतील. २३ सप्टेंबर रोजी रात्री रेल्वेने मुंबईला रवाना होतील.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम करूनही एवढ्या वर्षात विदर्भात यश मिळाले नाही. आता नागपूर, चंद्रपूर व अमरावती या तीन महापालिकांच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यामुळे या तीनही शहरांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राज ठाकरे हे चर्चा करतील. त्यांच्या अडचणी व अपेक्षा जाणून घेतील. पक्षात कुणाला आणणे गरजेचे आहे, कुणाला जबाबदारीपासून दूर करणे आवश्यक आहे, याचीही माहिती घेतली जाईल. या दौऱ्यात संबंधित तीनही महापालिकांसाठी मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जाणार आहे.
१३ सप्टेंबरला पाच सदस्यीय टीम येणार

- राज ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी १३ सप्टेंबर रोजी संदीप देशपांडे, अविनाश जाधव, आनंद एंबडवार, बबलू पाटील, राजू उंबरकर ही पाच सदस्सीय टीम नागपुरात येईल. तीनही जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून नियोजन केले जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत