घरकुलाच्या नावाखाली स्वाक्षऱ्या घेऊन दिली NOC; महिला सचिवाचा प्रताप
कोरपना:- गडचांदूर पासून अवघ्या 4 कि.मी.अंतरावर असलेल्या हरदोना खुर्द ग्रामपंचायतीच्या तत्कालीन महिला सचिव धोरात यांनी ग्रामसभेत घरकुल व इतर विकास कामांच्या नावाखाली तसेच हळदी कुंकवाच्या एका कार्यक्रमात महिलांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.आणि त्या स्वाक्षऱ्या मुंबई येथील एका स्थलांतरित दारू दुकानाला ना-हरकत देण्यासाठी वापरल्या.काही दिवसानंतर दारू दुकान येत असल्याची चर्चा ऐकून गावातीत काही तरुणांनी हरदोना ग्रामपंचायतला विचारले मात्र उउडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. माहिती अधिकाराचा वापर करून मिळालेल्या माहिती वरून खरे चित्र समोर आले.
विविध विकास कामांच्या नावाने तत्कालीन सचिव आणि सरपंच व सदस्यांनी चक्क दारू दुकानाला ना-हरकत देऊन आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर ग्रामवासी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.अंधारात ठेवून स्थलांतरित दारू दुकानाचा ठराव,दिलेली NOC त्वरित रद्द करण्याची मागणी करत 'आमचा दारू दुकानाला विरोध आहे,फसवणूक करणाऱ्या त्या तत्कालीन महिला सचिव आणि विश्वासघात करणाऱ्या संपुर्ण ग्रामपंचायत बॉडीवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा संतप्त हरदोना खुर्द येथील ग्रामवासीयांनी दिला आहे.
याविषयी सविस्तर असे की, हरदोना(खु) ग्रामपंचायत येथे 23 मार्च 2022 रोजी सरपंच शंकर टेकाम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. तत्कालीन ग्रामपंचायत सचिव रज्जू थोरात यांनी सर्वप्रथम विषय कार्यवाही बुकावर उपस्थित गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या.यानंतर विषयांना सुरूवात करण्यात आली. यातील विषय क्रं.2 म्हणजे मुंबई येथील भालचंद्र भाटकर यांची दारू दुकान हरदोना ग्रामपंचायत हद्दीत स्थलांतरण(सीएलथ्री लायसन्स) करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.मात्र असा कोणताही विषय त्यावेळी ठेवण्यात आला नव्हता. ग्रामपंचायत सरपंच, सचिव किंवा कोणत्याही सदस्यांना याची पूर्व माहिती दिली नव्हती,घरकुला विषयीची ही आमसभा होती,यांनी गुप्तपणे व धोक्याने आमच्या सह्यांचा वापर स्थलांतरित दारू दुकानासाठी केला,असे सनसनाटी आरोप ग्रामवासीयांनी केले आहे.
आमची फसवणूक करून सदर दारू दुकानाला दिलेले ना-हरकत(NOC) त्वरित रद्द करावी,याविषयी वरिष्ठ पातळीवर चौकशी करून दोषी आढळल्यास तत्कालीन ग्रामपंचायत सचिव,सरपंचासह समस्त बॉडीवर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा येत्या काळात अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा हरदोना येथील ग्रामवासीयांनी दिला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी चंद्रपूर, वने, सांस्कृतीक कार्यक्रम तथा मत्स्य व्यवसाय राज्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, अधिक्षक दारूबंदी विभाग, उपविभागिय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सचिव ग्रा.पं.हरदोना, आमदार सुभाष धोटे, माजी आमदार अॕड.संजय धोटे व इतर संबंधितांना निवेदन पाठवण्यात आल्याचे कळते. यासंदर्भात पुढे काय घडामोडी घडतात याकडेसर्वांचे लक्ष लागले आहे.