Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अभ्यासिका अन् वसतिगृहासाठी त्यांनी खुले केले स्वत:चे घर; गावतुरे कुटुंबीयांचा उपक्रम #chandrapur $mul

चंद्रपूर:- सत्यशोधक दिनाच्या १५०व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ. गावतुरे दाम्पत्यांनी यांच्या मूल येथील घराचा अर्धा भाग होतकरू गरीब विद्यार्थिनींसाठी वसतिगृह निर्माण करण्यासाठी तर अर्धा भाग अभ्यासिकेसाठी उपलब्ध करून दिला. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांची मोठी सोय उपलब्ध झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक २४ सप्टेंबर रोजी झाला. तसेच महात्मा फुले यांनी शुद्र अतिशुद्रांना मनुवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी २४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याला १५० वर्ष होत असल्याने सत्यशोधक समाज वर्धापन दिनाच्या उत्सवच साजरा न करता विधायक काम करावे, या अनुषंगाने गावतुरे कुटुंबीयांनी आपले घराचा अर्धा भाग वसतिगृहासाठी व अर्धा भागात अभ्यासिका तयार करून गरजू विद्यार्थ्यांसाठी खुले केले. अखिल भारतीय माळी महासंघ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, भूमिपुत्र ब्रिगेड आणि सत्यशोधक युवा मंचने शनिवारी मूल येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर यांच्या हस्ते झाले.
अध्यक्षस्थानी समाजसेविका बालरोग तज्ज्ञ डॉ. अभिलाषा गावतुरे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, रामभाऊ महाडोळे, नत्थूजी सोनुले, प्रा. विजय लोणबले, साहित्यिक ब्रह्मनंद मळावी, प्रल्हाद कावळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता प्रा. गुलाब मोरे, ज्ञानज्योती फाउंडेशनचे दिनकर मोहुर्ले, हिरालाल भडके उपस्थित होते. महात्मा फुले व सावित्रीआईच्या कार्याचा आदर्श पुढे ठेवून समाजाचे दुःख व त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी प्रत्येकांनी झटावे, असे प्रतिपादन डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी यावेळी केले. यावेळी ज्येष्ठ सत्यशोधक प्रल्हाद कावळे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रास्ताविक ॲड. प्रशांत सोनुले, संचालन डॉ. दीपक जोगदंड यांनी केले.
१५० गावांत सत्यशोधक शिबिर राबविणार

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याला २४ सप्टेंबर रोजी १५० वर्षांत पदार्पण होत आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील १५० गावांत सत्यशोधक प्रबोधन शिबिर घेण्यात येणार आहेत. तसेच गावागावांत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालये व अभ्यासिका तयार करण्यासाठी तसेच सत्यशोधक युवा मंच तयार करणे, असे तीन संकल्प यावेळी घेण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत