Top News

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान प्रभावीपणे राबवा:- जिल्हाधिकारी गुल्हाने #chandrapur


27 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे अभियानाचा शुभारंभ

जिल्ह्यातील महिलांची नवरात्रोत्सवात होणार आरोग्य तपासणी
चंद्रपूर:- राज्यभरात 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत 18 वर्षांवरील महिला, माता, गरोदर महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यशस्वीतेसाठी हे अभियान जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील विस कलमी सभागृहात आयोजित जिल्हा आरोग्य समिती नियोजन मंडळाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे, महिला व बालकल्याण अधिकारी संग्राम शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, शिक्षणाधिकारी (प्राथ.) दिपेंद्र लोखंडे, डॉ. राठी, अजय नंदनवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गुल्हाने म्हणाले, नवरात्र उत्सवात राबवल्या जाणाऱ्या अभियानात एक महिन्याच्या कालावधीत 18 वर्षावरील सर्व महिला, माता व गरोदर स्त्रियांची आरोग्य तपासणी करावी. या अभियानांतर्गत मातांना तज्ञांमार्फत तपासणी, समुपदेशन व औषधोपचार द्यावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त माता व इतर 18 वर्षावरील महिलांच्या तपासणीचे आयोजन करावे. त्यामध्ये प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक सुविधा उपलब्ध करून सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी समुपदेशन करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
27 सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय, बल्लारपूर येथे या अभियानाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. शिबिरांमध्ये महिलांचे डेंटल, सर्व आरोग्य तपासणी व मानव विकास शिबिरे घेण्यात येतील. तसेच ग्रामीण रुग्णालय, पोंभुर्णा, वरोरा व गडचांदूर येथे महिलांकरीता विशेष दिव्यांग तपासणी शिबिर आयोजित करून दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. या मोहिमेतंर्गत 18 वर्षावरील सर्व महिलांचे आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असून मोहिमेदरम्यान निदान झालेल्या महिलांच्या शस्त्रक्रिया व इतर उपचार मोफत व महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे राबविण्यात येणार आहे.
दि. 15 ते 30 सप्टेंबरदरम्यान आयुष्मान भारत पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे. आयुष्मान भारत दिवसाचे औचित्य साधून कैलाश रामटेके व अंजना उत्तम मालकर या लाभार्थींना आयुष्मान कार्डचे वितरण तर उत्कृष्ठ कार्याबद्दल आरोग्यमित्र अनिता येन्नावार व रुपेश उमरे या आरोग्यमित्रांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने