चंद्रपूर:- वेकोलीमधील एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून ५० हजारांची लाच घेताना महाकाली भूमिगत कोळसा खाणीचे व्यवस्थापक एस. एम. धांडे यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई नागपूर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) केली आहे. कारवाईनंतर आरोपी व्यवस्थापकाच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील आणि शहराला लागून असलेल्या महाकाली भूमिगत कोळसा खाणीतून सेवानिवृत्त झालेल्या एका कर्मचाऱ्याला वेकोलिकडून ग्रॅच्युइटी म्हणून 20 लाख रुपये घ्यायचे होते. महाकाली खाणीचे व्यवस्थापक एम. एम. धांडे यांनी ग्रॅच्युइटी मंजुरीसाठी 50 हजारांची लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने सीबीआय नागपूरकडे तक्रार दाखल केली.
काल (गूरूवार) सीबीआयने सापळा रचून खाणीजवळ व्यवस्थापक धांडे याला ५० हजारांची लाच घेताना रंगेहात अटक केली. त्यानंतर आरोपी व्यवस्थापकाच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. मागील दोन महिन्यांत सीबीआयने वेकोलीच्या अनेक लाचखोर अधिकाऱ्यांना पकडले आहे.
सीबीआयच्या कारवाईमुळे वेकोलीमध्ये खळबळ उडाली आहे. घुसखोरी करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची तक्रार सीबीआयने मागविली असल्याची माहिती आहे. सीबीआय उपमहानिरीक्षक एम. एस. खान यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा तपास सुरू आहे.