Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

कापूस वेचायला गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार #chandrapur #mul

मुल:- शेतावर कापूस वेचायला गेलेली ४५ वर्षीय महिला वाघाच्या हल्यात ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि.१६) मूल तालुक्यात दुपारच्या सुमारास घडली. कल्पना अरूण लोनबले असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. मूल तालुक्यातील कांतापेठ निवासी कल्पना अरूण लोनबले ही महिला मंगळवारी दुपारच्या सुमारास गावापासून जवळच असलेल्या शेतात कापूस काढण्यासाठी गेली होती. जानाळा शेतशिवाराजवळील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रं. ५२३ मध्ये दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास महिला शेतात कापूस वेचत होती.
दरम्यान त्याच कापसाच्या शेतात वाघ दबा धरून बसला होता. शेतात वाघ असल्याची तिला कल्पना नसल्याने वाघाने तिच्यावर हल्ला चढविला. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वाघाने तिचा मृतदेह फरफटत इतरत्र नेला. सदर महिला घरी परत न आल्याने नागरिकांनी तिच्या शेतशिवारात शोधशोध केली. दरम्यान, वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रं. ५२३ मध्ये त्या महिलेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती वनविकास महामंडळाचे सहा. व्यवस्थापक खामकर, वनपरिक्षेत्राधिकारी पिंजारी यांना देण्यात आली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन घटनेची पहाणी केली. मृतदेहाचा पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीकरीता मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. वनविभागाच्या वतीने मृतक महिलेच्या कुटूंबियांना आर्थिक मदत करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत