जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांच्या अनेकविध यशस्वी कार्यांचे यश #chandrapur #Mumbai

Bhairav Diwase
0

मेडिसीन ॲन्ड अलाईड एक्सलन्स हेल्थ केअर अवॉर्डने सन्मानित
मुंबई:- डॉ.अनिल जे. रूडे यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात असलेल्या सायखेडा गावातील असले तरी पोलीस खात्यात असलेल्या वडिलांच्या नोकरीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे १ जानेवारी १९६५ रोजी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण ब्रह्मपुरीत झाल्यानंतर १९८७ मध्ये त्यांनी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथून एमबीबीएस, तर १९९३ मध्ये एमडी (मेडिसीन) ही पदव्युत्तर पदवी घेतली. डिसेंबर १९९१ मध्ये ग्रामीण रुग्णालय, नागभिड येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत त्यांना पहिली पोस्टिंग मिळाली. २०१७ मध्ये नोकरी करतानाच त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉस्पिटल ॲन्ड हेल्थ मॅनेजमेंट, ‘इग्नू’ मधून २०२० मध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन जेरिॲट्रिक मेडिसीन त्यांनी पूर्ण केले.
डॉ.रुडे यांचे वडील एएसआय (सहायक पोलीस उपनिरीक्षक) तर आई शिक्षिका होती. अनुराग शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष म्हणूनही आईने काम पाहिले.त्यांच्या जीवनात आईचा शैक्षणिक,सामाजिक आणि कौटुंबिक प्रभाव असल्याने डॉ अनिल रुडे यांनी १९९४ मध्ये एमपीएससी उत्तीर्ण केल्यानंतर गडचिरोली जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून ते रुजू झाले. आणि आजतागायत याच नक्षलग्रस्त जिल्ह्यात शासकीय सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी उत्कृष्ट सेवा केल्यामुळे बढती होऊन ते अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक आणि आता ४ वर्षांपासून जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून ते अविरतपणे गडचिरोली जिल्ह्यात उत्तम प्रकारे आरोग्य सेवा देत आहेत.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर गडचिरोली जिल्ह्याला सर्वाधिक काळ कोरोनामुक्त (ग्रीन झोन) ठेवण्याचे श्रेय जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून डॉ.रुडे यांच्या नियोजनाला जाते. कोरनाचा प्रवेश झाल्यानंतरही आतापर्यंत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत उत्कृष्ट सेवा या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांत मिळाली आहे. इतर जिल्ह्यात जेव्हा रुग्णांना बेड उपलब्ध होत नव्हते, त्यावेळी गडचिरोली जिल्ह्याच्या शासकीय रुग्णालयात नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्ण सेवा घेत होते. कोणालाही कधी ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही. इतर जिल्ह्यातील जवळपास ६५० रुग्णांवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात यशस्वीपणे उपचार करण्यात आले. डॉ.रुडे यांनी कोरोना काळात कोविड वॉर्डात दररोज स्वत: राऊंड घेऊन १६-१६ तास ड्युटी करणारे हे एकमेव सिव्हील सर्जन आहेत.
यादरम्यान गडचिरोलीत तात्काळ आरटीपीसीआर टेस्ट लॅबची सुविधा करण्यात आली. त्याबरोबरच जिल्ह्यात ११ ठिकाणी ऑक्सिजन प्लान्ट तयार करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे यांच्या उत्कृष्ट आणि नियोजनबद्ध सेवेमुळेच गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूदर अत्यल्प होता.
जिल्हा सामान्य रुग्णालयाला २०१८ मध्ये पहिला कायाकल्प पुरस्कारही मिळाला. सुसज्ज आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बाह्यरुग्ण विभागचे बांधकाम डॉ.रूडे यांच्याच काळात वेगाने सुरू झाले. प्रत्येक ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात टेलिमेडिसिनची चांगली व्यवस्था सुरू केली. मोतीबिंदू, काचबिंदू, टीबी उपचारात मोलाची कामगिरी झाली आहे. राज्यातील मोतीबिंदू शस्रक्रियांमध्ये गडचिरोली जिल्ह्याने प्रथम क्रमांकाची कामगिरी झाली आहे. एएनएम, जीएनएम नर्सिंग कॉलेज सुरू असुन आता कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी केमोथेरपी आणि डायलेसिसची व्यवस्थाही जिल्हा रुग्णालयात सुरू झाली.
जिल्ह्याच्या आरोग्य सेवेचा कायापालट करण्यासाठी त्यांचा सिहांचा वाटा आहे. जिल्ह्यातील अनेक शासकीय रुग्णालयात डीजीटल एक्स-रे मशिन, सीटी स्कॅनची सुविधा, १०० बेडचे महिला व बाल रुग्णालय सुरू होऊन आता विस्तारित १०० बेडचे कामही त्यांच्या कार्यकाळात सुरू झाले. याशिवाय अहेरी येथे १०० बेडचे रुग्णालय होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्डिॲक कॅथलॅब सुरू आहे. त्यामुळे हृदय रुग्णांना नागपूर सारख्या ठिकाणी जावे लागणार नाही.
गडचिरोलीत शासकीय मेडिकल कॉलेज उभारणीचा प्रस्ताव त्यांनीच राज्य शासनाकडे पाठविला आहे. ग्रामीण रुग्णालयांना प्रत्येकी ३० बेड मंजूर होते ते आता ५० होणार आहेत. सर्व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि महिला रुग्णालयात ब्लड स्टोरेज युनिट कार्यान्वित होत आहे. जिल्हाभरात जवळपास १५० ॲम्बुलन्स कार्यान्वित असून मुलचेरा, भामरागड, कोरची येथे शवागाराचे बांधकाम सुरू केले आहे. तसेच औषधीचा साठा व ब्लड स्टोरेजसाठी सुविधा उपलब्ध केली जात आहे. अनेक रुग्णालयांमध्ये एनआरसीची सुविधाही होत आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयात हिप जॉईन्ट रिप्लेसमेंटची सुविधा, आरओ प्लान्ट तसेच फायर ऑडिट नियमित सुरू होत आहे. गडचिरोली जिल्ह्यात डेंटल कॅम्प नियमितपणे होत आहेत. मुक्तिपथ अभियानाच्या सहकार्याने तंबाखू, दारू, गुटखा नियंत्रणासाठी आरोग्य विभागाचे काम सुरू आहे. सर्पदंश आणि हृदयरुग्णांवर विशेष उपचार करून शेकडो रुग्णांचे डॉ.रूडे यांनी प्राण वाचविले. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांनी याच जिल्ह्यात काम करावे अशी जनतेंनी राज्य शासनाकडे मागणी केली आहे.
वैद्यकीय क्षेत्रासोबत गायन हा डॉ.रुडे यांचा आवडीचा विषय आहे. त्यांनी जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत असतांनाच शैक्षणिक आवड असल्याने अनेक विषयांत पदवीत्तर पदवी आणि कायदा विषयातीलही एल. एल. एम. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.सामाजिक क्षेत्रातही त्यांचे काम सदैव सुरू असते. त्यांना मे १९९९ मध्ये आदर्श समाजसेवक पुरस्कार, भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे वर्ष २००० मध्ये डॉ.आंबेडकर फेलोशिप, २००४ मध्ये जनसेवा सद्भावना पुरस्कार त्यांना मिळाला .याशिवाय गंधर्व म.वि. मंडळ मुंबईतर्फे संगीत विशारद परीक्षाही डॉ.रूडे यांनी उत्तीर्ण केली. मुकेश, जगजितसिंग या गायकांच्या आवाजातील अनेक गाणी गायली. टी-सिरीजने त्यांचा अल्बमही काढला. भविष्यात आरोग्य सेवेत स्वत:ला झोकून देऊन शांतपणे जीवन जगण्याची ईच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)