चंद्रपूर तालुक्याचा कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत समावेश #Chandrapur

Bhairav Diwase
0
आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश
Kishor jorgewar
चंद्रपूर:- आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणीला यश आले असुन कापूस उत्पादक तालुक्यांच्या यादीत आता चंद्रपूर तालुक्याच्या समावेश करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय १८ नोव्हेंबर २०२२ ला सहकार पणन व वस्त्र विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे. या निर्णयानंतर आता चंद्रपूरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळणार आहे.


वस्त्र उद्योग धोरण राबविण्यासाठी कापूस उत्पादक तालुका म्हणून कृषी अधिकारी यांचा अहवाल आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली होती. ही अट रद्द करुन शेती आधारित उद्योग वाढीस चालना आणि रोजगार निर्मिती करिता चंद्रपूर तालुका हा कापूस उत्पादक तालुका म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांची मुंबई येथे भेट घेऊन केली होती. त्यानंतर याची दखल घेत सदर निर्णय घेण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी हजारो हेक्टर क्षेत्रात कापूस पिकांची लागवड करीत असून मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेत आहे. राज्य शासनाच्या वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३ नुसार सहकारी तत्त्वावरील सूतगिरण्यांकरिता शासकीय भागभांडवल योजना राबविण्याकरिता राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील १८ जिल्ह्यातील ११५ तालुके कापूस उत्पादक तालुके म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक तालुके म्हणून वरोरा, भद्रावती, राजुरा व कोरपना या तालुक्यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र यात चंद्रपूर तालुक्याला वगळण्यात आले होते.


चंद्रपूर तालुक्यामध्येसुध्दा मोठ्या प्रमाणात कापुस उत्पादन होत असून येथील शेतकऱ्याकडून हंगामात दररोज हजारो क्विंटल कापूस सीसीआय व पणन महासंघ कडून खरेदी केली जाते. तालुका कृषी अधिकारी चंद्रपूर यांच्या तर्फे चंद्रपूर तालुक्यातील मागील ८ वर्षाचा कापूस लागवड व उत्पनाच्या दाखल्यावरून येथील कापूस उत्पादन सरासरी ९७२२.३८ टन आहे हे स्पष्ट होते.

 “वस्त्रोद्योग धोरण २०१८-२३” च्या कापूस उत्पादक तालुका घोषित करण्याच्या निकषानुसार किमान ९६०० टन कापूस उत्पादन होणे आवश्यक आहे. त्यानुसार चंद्रपूर हा कापूस उत्पादक तालुका घोषित होणे आवश्यक होते. असे असतांनाही चंद्रपूर तालुक्याला कापूस उत्पादक तालुक्याच्या यादीतून वगळण्यात होते. परिणामी सहकारी तत्त्वावर चालविण्यात येणाऱ्या सूतगिरण्याकरिता शासकीय भागभांडवल योजने पासुन हा तालुका वंचित झाला होता. ही बाब लक्षात घेता तसेच चंद्रपूर येथे शेती आधारित उद्योग वाढीस चालना आणि रोजगार निर्मितीकरिता चंद्रपूर तालुका हा “कापूस उत्पादक तालुका” म्हणून घोषित करण्यात यावा अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी सहकार मंत्री अतुल सावे यांची भेट घेत केली होती. 


यावेळी त्यांनी चंद्रपूर तालुक्यातील कापुस उत्पादन क्षमतेबाबतही ना. सावे यांना अवगत केले होते. सदर मागणीचा पाठपूरावाही आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सातत्याने पाठपुरावा सुरु होता. अखेर सहकार पणन व वस्त्र विभागाच्या वतीने त्याच्या या मागणीची दखल घेण्यात आली असुन चंद्रपूर तालुक्याला कापुस उत्पादक तालुका म्हणुन घोषीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता चंद्रपूर तालुक्यातील कापुस उत्पादक शेतक-यांना याचा फायदा होणार असून यातून रोजगार निर्मिती होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)