Top News

सामाजिक सभागृह हे विचार प्रबोधनाचे केंद्र व्हावे:- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले, वीर बाबुराव शेडमाके व संताजी जगनाडे महाराज सभागृहाचे लोकार्पण


पोंभूर्णा:- नगर पंचायत व बांधकाम विभागा अंतर्गत पोंभुर्णा येथे महात्मा ज्योतीराव फुले, वीर बाबुराव शेडमाके व संताजी जगनाडे महाराज या तीन सामाजिक सभागृहाचे लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या सभागृहाचे लोकार्पण राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरपंचायत उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार, नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अधिकारी, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आशिष घोडे, अलका आत्राम, नगरसेवक आकाशी गेडाम,श्वेता वनकर, अभी बद्दलवार, अतुल वाकडे, संजय कोडापे, मनोज रणदिवे, नंदा कोटरंगे, रोहणी ढोले, दर्शन गोरंटीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्व समाजाची प्रगती व उन्नतीच्या दिशेने योग्य प्रवास व्हावा, यासाठी शासन प्रयत्नशील आहे. या प्रयत्नात सर्वांनी सहभागी होण्यासाठी व गावाच्या प्रगतीचे चिंतन, मंथन करण्यासाठी सामाजिक सभागृहाचा उपयोग करावा. सामाजिक सभागृहे ही केवळ दगडमातीची इमारत न राहता विचार आणि प्रबोधनाची केंद्र व्हावीत, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले

महात्मा फुले यांनी सांगितलेला सत्यशोधकाचा मार्ग, वीर बाबुराव शेडमाके यांचा वीरतेचा आणि संताजी जगनाडे महाराजांच्या सेवेच्या विचारावार पुढे जावून भविष्याचा वेध घेण्यासाठी एकत्रित चिंतन करण्यासाठी सामाजिक सभागृहांचा उपयोग व्हावा, अशी अपेक्षा पालकमंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, स्थानिक नागरिकांनी आपल्या कौशल्यातून तयार केलेले कारपेट व वनउपजावरील इतर वस्तू संपुर्ण भारतात विक्रीसाठी जाव्यात व ते आत्मनिर्भर बनावे यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू.

पोंभुर्णा येथे तहसील कार्यालय, नगर पंचायतचे व्हाईट हाऊस, व्यायामशाळा, पत्रकार भवन, स्टेडियम, आयटीआय, श्री राजराजेश्वर मंदिर, रस्ते, तलावाचे सौंदर्यीकरण, पंचायत समिती इमारत, आठवडी बाजार, पाणी पुरवठा योजना, विश्रामगृह अद्यावतीकरण, वैद्यकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने, स्मशानभूमी बांधकाम आदी विविध विकासकामे करण्यात आली आहेत. अतिवृष्टीमुळे बाधित एकही शेतकरी शासकीय मदतीपासून सुटता कामा नये. सर्व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी, यासाठी आपण प्रशासनाला निर्देश दिल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.

देवराव भोंगळे यांनी महाराष्ट्रातील सर्वात विकसित तालुका म्हणून पोंभुर्णाची ओळख असल्याचे व पोंभुर्णा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते आतापर्यंत विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेता आशिष कावटवार यांनी पोंभूर्णा शहरात पाणी पुरवठा योजना करिता निधी कमतरता असल्याचे व तालुक्यात सर्व शेतकऱ्यांना सरसकट अतिवृष्टीची मदत जाहीर करावे, तालुक्यात नदी,नाले असून सिंचनाची सोय बंधारा,डॉम करण्याची मागणी केले.

नगर पालिकेचे लेखाधिकारी सुशांत आपटे यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती देतांना तीनही सभागृहासाठी प्रत्येकी 75 लक्ष रुपये खर्च आल्याचे सांगितले. रोशन येमूलवार यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. याप्रसंगी पोंभुर्णा येथील माळी समाज, तेली समाज व आदिवासी समाजाच्या संघटनांचे पदाधिकारी, समाज बांधव संबंधित अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने