अनैतिक संबंधाच्या संशयातून पतीने गळा दाबून केली पत्नीचा हत्या #chandrapur #Sironcha #murder

Bhairav Diwase


सिरोंचा:- पत्नीचे मामाच्या मुलासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी येथील वाॅर्ड क्रमांक ७ मध्ये घडली. श्रवंती गणेश मिट्टापल्ली (३० वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी पती गणेश भिक्षापती मिट्टापल्ली याला अटक केली.

मूळचा तेलंगणातील असलेला गणेश गेल्या आठ वर्षांपासून सिरोंचा येथे राहतो. तो गावोगावी भांडी, कपडे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याला एक मुलगाही आहे; पण पत्नीचे तिच्या तेलंगणातील मामाच्या मुलासोबत अनैतिक संबंध असल्याचा गणेशला संशय होता. त्यातूनच सोमवारी सायंकाळी ४.३० ते ५.३० वाजेदरम्यान त्याने दर्ग्याजवळील आपल्या भाड्याच्या घरात पत्नी श्रवंती हिचा गळा दाबून तिला जिवे मारले.

ही बाब उघडकीस आल्यानंतर गणेश याच्याविरुद्ध रात्री ११ वाजता कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यरात्री त्याला अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ९ तारखेपर्यंत पीसीआर दिला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुहास शिंदे करीत आहेत.