वाचन संस्कृतीच्या चळवळीला लोकाश्रयाची गरज#chandrapur


परिसंवादातील वक्त्यांचा सूर

साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावला आहे का?


चंद्रपूर:- साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावतो आहे, हे जरी खरे असले तरी नव्या पिढीला कसे वाचायला आवडते हे समजून नव्याने साहित्य निर्मितीची गरज आहे. तसेच वाचन संस्कृतीची चळवळ पुढे नेण्यासाठी केवळ राजश्रयावर अवलंबून न राहता लोकश्रयाचीही गरज आहे, असा सूर वक्त्यांनी काढला.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, सर्वोदय शिक्षण मंडळ चंद्रपूर, सूर्यांश साहित्य व सांस्कृतिक मंच चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात विदर्भ साहित्य संघाचे 68 व्या विदर्भ साहित्य संमेलन सुरू आहे. त्यातील ‘साहित्य व अवांतर वाचनापासून मराठी वाचक दुरावला आहे का, या विषयावर आयोजित चर्चासत्रात वक्ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल बोरगमवार, तर संजय कांबळे, अनमोल शेंडे, ज्योत्स्ना पंडित, निखील वाघमारे विचारपीठावर उपस्थित होते.

बोरगमवार म्हणाले, वाचन संस्कृती समाजात रुजावी यासाठी आपल्या घरापासून सुरूवात व्हायला हवी. मी भ्रमणध्वनीवर केवळ मराठीतून संदेश पाठविणार, कुठल्याही समारंभात गुलदस्ता न देता पुस्तकच देणार असे प्रत्येकाने ठरविल्यास ही चळवळ पुढे जाण्यास मदत होईल. संजय कांबळे यांनी, हजार वर्षाच्या वाचन संस्कृतीपासून आज वाचक का दुरावत आहे यावर समाजातील सर्व घटनांनी चिंतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. अनमोल शेंडे यांनी, शाळा, महाविद्यालयातील ग्रंथ संस्कृती कशी विकसित होईल, याकडे शिक्षक व प्राध्यापकांनी विशेष लक्ष देण्याची गरज प्रतिपादित केली. ज्योत्स्ना पंडित यांनी, आज नवीन पिढीची वाचनाबद्दल आवड बदलली असून, त्यांच्या आवडीनुसार साहित्य त्यांच्यापर्यंत पोहचविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. तर, निखिल वाघमारे यांनी, अनेक लेखकांची दर्जेदार साहित्य आज नवीन पिढीला माहिती नसून, दूर्लक्षित लेखकाचे साहित्य समाजापर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न व्हावे, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सायली लाखे यांनी, तर आभार तनुजा बोढाले यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या