Top News

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची चंद्रपुरात जाहीर सभा #chandrapur



चंद्रपूर:- देशातील ज्या लोकसभा मतदार संघात भाजपाचे खासदार नाहीत, अशा 144 जागांवर पक्ष अत्यंत प्रभावी आणि नियोजनबध्द योजना राबविण्याच्या तयारीत आहे. महाराष्ट्रात अशा 16 जागा आहेत, जिकडे विशेषत्त्वाने लक्ष घातले जात आहे. चंद्रपूर त्यातले एक लोकसभा मतदार संघ आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी येथे येऊन गेलेत. याच योजनेचा पुढचा भाग म्हणून येत्या 2 जानेवारी 2023 रोजी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा चंद्रपूर दौरा आखला गेला असून, सकाळी 10 वाजता त्यांची येथे जाहीर सभा होणार आहे.

नड्डा यांच्या दौर्‍याची सविस्तर माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) देवराव भोंगळे, जिल्हाध्यक्ष (महानगर) डॉ. मंगेश गुलवाडे यांनी गुरूवारी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत दिली. यावेळी माजी आमदार संजय धोटे, अहेतेशाम अली, रवी गुरूनुले प्रभृती उपस्थित होते.


भोंगळे म्हणाले, लोकसभा प्रवास योजनेंतर्गत जे. पी. नड्डा यांचा राज्यात हा पहिलाच दौरा असून, त्यातही ते पहिल्यांदा चंद्रपुरात येत आहेत. सकाळी 9.30 वाजता येथील मोरवा विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. तर 10 वाजता न्यू इंग्लिश मैदानावर त्यांची जाहीर सभा होईल. या सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.


येणार्‍या लोकसभेच्याद्दष्टीने आणि लवकरच होणार्‍या जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जे. पी. नड्डा यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे. राज्यातील ज्या 16 जागांवर सध्या भाजपाचे खासदार नाहीत, त्याठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्याद्दष्टीने केंद्रीय नेतृत्वाचे दौरे आयोजित करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री हरदीपसिंग सुरी येथे येऊन गेलेत. ते येत्या दोन-चार महिन्यांच्या अंतराने पुन्हा पुन्हा येणार आहेत. त्याच मांदियाळीत आता जे. पी. नड्डा यांचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही चंद्रपुरात येणार आहेत.


जे. पी. नड्डा यांची चंद्रपूरची जाहीर सभा आटोपल्यानंतर लोकसभा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्त्यांची येथे बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी ते संभाजीनगर कडे रवाना होतील, अशी माहिती देवराव भोंगळे व डॉ. मंगेश गुलवाडे यांनी यावेळी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने