राजुरा:- गावातील काही युवक आपसात खेळत असताना तेथे आलेल्या एका युवकाने मला हि खेळायचे आहे, मात्र त्याला खेळू न दिल्याने शुल्लक कारणावरून झालेल्या वादात धारधार शस्त्राने युवकाची हत्या केल्याची खळबळजनक घटना राजुरा पासून अवघ्या ३ किमी अंतरावर असलेल्या बामणवाडा या गावात घडली.
पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीनुसार आज सकाळी ८ वाजताच्या दरम्यान महादेव कोडापे वय २२ वर्ष (रा बामणवाडा) हा गावातील काही लोकांसोबत गावात खेळत होता. तिथे आलेल्या शक्ती टेकाम वय २२ वर्ष (रा. बामणवाडा) याला खेळू न दिल्याने शक्ती ने खेळत असलेल्या जागेवर पाणी टाकले यामुळे महादेव कोडापे व शक्ती टेकाम यांच्यात भांडण झाले. या भांडणाचा राग मनात ठेऊन शक्ती टेकाम याने स्वताच्या कमरेतून धार-धार लोखंडी सूरी काढत महादेव कोडापे याच्या पोटात खुपसली. हे पाहताच घटनास्थळी एकच कल्लोळ उडाला. उपस्थित लोकांनी शक्तीला आवरले आणि महादेवाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे नेण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी गंभीर अवस्थेत जखमी असल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात स्थलांतरित केले, मात्र चंद्रपूर येथे पोहचता डॉक्टरांनी महादेवला मृत घोषित केले.
क्षुल्लक कारणाने झालेल्या या घटनेने काही वेळ गावात तणाव झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा गावात पोहचला. पोलिसांनी शक्ती टेकाम याला ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्याच्या विरुद्ध भादंवि ३०२, शस्त्र अधिनियम कलम २५,४, १३५,३७ अन्वये गुन्हा दाखल केला असून समोरील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष दरेकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.