पाणीकर चुकवणार्‍या 86 थकबाकीदारांवर कारवाई #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- पाणीपट्टी कराचा भरणा न करणार्‍या 86 लाभधारकांची नळ जोडणी चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे बंद करण्यात आली असून, कराचा भरणा त्वरित करा अन्यथा नळ कपातीस तयार असा आदेशच मनपाद्वारे देण्यात आला आहे. यापुर्वी 65 व दोन दिवसात 26 अशा एकूण 86 थकबाकीदारांवर नळ कपातीची कारवाई करण्यात आली आहे.

पाणीकराची करवसुली मोठ्या प्रमाणात थकित असल्याने मनपातर्फे करवसुली मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. पाणीपट्टी कर वसुलीसाठी मनपाद्वारे 12 पथके गठित करण्यात आली असून, आर्थिक वर्ष 2022-23 करिता 12.97 कोटी रुपये थकित मागणी व 5.45 कोटी रुपये चालू मागणी अशी एकूण 18.43 कोटी रुपये पाणीपट्टी कराची वसुली थकित आहे. यापूर्वी शहरातील नळधारकांनी थकित कराचा भरणा करावा यासाठी मनपामार्फत सूट देण्यात आली होती.

या अंतर्गत 31 ऑक्टोबर पर्यंत कराचा एकमुस्त भरणा केल्यास 10 टक्के आणि 1 नोव्हेंबर 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत पाणी कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी 5 टक्के सुट देण्यात आली होती. यापुढे मनपातर्फे कुठलीही सुट मिळणार नसल्याने त्वरित कराचा भरणा करावा अन्यथा कारवाईस सामोरे जाण्याचा इशाराही मनपातर्फे देण्यात आला होता. मनपाचे 51 अधिकारी व कर्मचार्‍यांची 12 पथके सुटीच्या दिवशीही कार्यरत असून, थकबाकी वसुली तसेच थकबाकी न भरल्यास नळ जोडणी कपात करण्याची कारवाई केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)