ट्रकच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू #chandrapur #gadchiroli #accident

Bhairav Diwase


गडचिरोली:- लोहखनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने मोटारसायकलस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१६) सायंकाळी सातच्या सुमारास अहेरी तालुक्यातील मद्दीगुडम गावाजवळ घडली. निकेश चोखारे ( वय ३०, रा. लक्ष्मणपूर, ता.चामोर्शी ) असे मयत युवकाचे नाव आहे.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाणीतून लोहखनिज उत्खनन करण्याचे काम सुरू आहे. दररोज लोहखनिजाची वाहतूक करणारे ट्रक सुरजागड-एटापल्ली-अहेरी-आष्टी मार्गे चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दिशेने ये-जा करीत असतात. तीन महिन्यांपूर्वी सुरजागड येथील ट्रकच्या अपघातात लगाम गावाजवळ एक महिला ठार झाली होती. वारंवार घडणारे अपघात आणि खराब रस्ते यामुळे नागरिक संतापलेले असतानाच एका ट्रकने निकेश चोखारे या युवकाचा बळी घेतला आहे.

निकेश हा लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीमध्येच काम करतो. कंपनीच्या मद्दीगुडम येथील कार्यालयातून येत असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी अज्ञात ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे.