अचानक आलेल्या रानडुकराच्या कळपाने केला घात #chandrapur #gondpipari #accident

Bhairav Diwase
बैलबंडीचे चाक छातीवरून गेले अन्....


गोंडपिपरी:- शेतातून बैलबंडीवरून कापूस भरून आणताना समोरून रानडुकराचा कळप आला. यामुळे बैल गोंधळले. यात युवा शेतकरी खाली कोसळला आणि बैलबंडीचे चाक त्याच्या छातीवरून गेले. यात तो गंभीर जखमी झाला. उपचारासाठी चंद्रपूरला नेत असताना त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली.

तुषार वांढरे (३२) असे युवा शेतकऱ्याचे नाव असून, तो गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील रहिवासी होता. तुषार वांढरे याची नवेगाव वाघाडे येथे शेती आहे. कापूस आणण्यासाठी तो शेतात गेला होता. बैलबंडीत कापूस भरून तो घरी निघाला. दरम्यानच्या मार्गावरून रानडुकराचा कळप बैलबंडीसमोरून गेला. यामुळे बैल गोंधळले. यात तुषार खाली कोसळला. त्याच्या छातीवरून बैलबंडीचे चाक गेले. यात तो गंभीर जखमी झाला.

गोंडपिपरीच्या ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला रेफर करण्यात आले. मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तुषारच्या कुटुंबीयांना वनविभागाने मदत द्यावी, अशी मागणी केली जात आहे.