चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला चाकू भोसकले
नागपूर:- केवळ 20 रुपये उधारीवरुन झालेल्या वादातून चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील जरीपटका परिसरात घडली आहे.
या हल्ल्या दुकानदार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून गेला. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. शुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत पाणीपुरीचा ठेला लावून पीडित विक्रेता आपला उदरनिर्वाह करतो. मात्र त्याच्याच बाजूला चिकनचे दुकान असलेल्या आरोपीने या ठेलेवाल्याकडून 20 रुपयाची उधारीवर पाणीपुरी खाल्ली.
पाणीपुरीवाल्याने जेव्हा दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे उधारीचे पैसे मागितले, तेव्हा आरोपीला राग आला. आोरपीने रूक तेरे गुपचूप उधारी देता हू, तू मुझे उधारी मांगता है असं म्हणत धमकी दिली.
यानंतर आपल्या चिकनच्या दुकानात जाऊन कोंबडी कापण्याचा चाकू घेऊन आला आणि त्याच्या पोटात भोसकला. यामध्ये पाणीपुरीवाला गंभीररित्या जखमी झाला. यानंतर आरोपीने त्या ठिकाणावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी त्याला शोधून अटक केली.
केवळ 20 रुपयाच्या उधारीवरून या आरोपीने चक्क त्या पाणीपुरीवाल्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच नशीब बलवत्तर म्हणून तो बचावला.