भारतीय संस्कृती आणि संस्कार घट्ट करण्यासाठी उपक्रम राबविणार:- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सवप्रसंगी प्रतिपादन
चंद्रपूर:- चंद्रपुरातील मातोश्री वृद्धाश्रमाचे कार्य उल्लेखनीय आहे. या वृद्धाश्रमाला सीएसआर निधीतून आर्थिक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून कोणताही आधार नसणाऱ्यांना वृद्धाश्रमासारखा उपक्रम मोठा सहाय्यभूत ठरतो, , असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मातोश्री वृद्धाश्रमाच्या रौप्य महोत्सव समारंभात ते बोलत होते.
याप्रसंगी वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, मातोश्री वृद्धाश्रमाच्या अध्यक्षा माजी मंत्री शोभाताई फडणवीस, आमदार कीर्तीकुमार भांगडिया, आमदार सुभाष धोटे,आमदार किशोर जोरगेवार, आमदार प्रतिभा धानोरकर, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, चंदनसिंह चंदेल, डॉ. शरद सालफले, वसंत थोटे, राजेंद्र संचेती, दत्तोपंत काशीकर, रजनी हजारे, अजय जयस्वाल, शैलेश बागेला आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले की, भाजप व शिवसेनेचे सरकार असताना ज्येष्ठ नागरिकांना विविध वृद्धाश्रमांच्या माध्यमातून आधार मिळाला, तो आजही मिळत आहे. पाश्चात्य देशांपेक्षा भारताची संस्कृती महान आहे. भारतीय संस्कृती आपल्याला त्याग शिकविते. आपली शिक्षण संस्थाही आापल्याला ‘मातृदेवो भव..पितृदेवो भव..’ची शिकवण देते. परंतु एकविसाव्या शतकात काही बदल झालेत. तंत्रज्ञानाच्या प्रभावात प्रेमाचा व आपुलकीचा अभाव निर्माण झाला. त्यामुळे घरातील वडिलधारे व्यक्ती काहींना नकोसे झालेत. परिणामी वृद्धाश्रमांची गरज समाजात निर्माण झाली. समाजात जर वृद्धाश्रमाची गरज भासत असेल तर ही बाब चिंतन करायला भाग पडणारी आहे.
सांस्कृतिक मंत्री म्हणून भारतीय संस्कार पुन्हा रूजविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना संविधानाने सांगितलेली जबाबदारी, अधिकार,कर्तव्य शोधणे नितांत गरजचे आहे. वडिलधारी व्यक्तींचे योग्य संगोपन करणे, देखभाल करणे हे देखील महत्वाचे कर्तव्य आहे. मातोश्री वृद्धाश्रमाच्या कार्याचा गौरव करताना ना.मुनगंटीवार यांनी या संस्थेच्या परिसरात ‘बोलके वॉलकम्पाऊंड’ उभारणार असे नमूद केले.निराधारांसाठी असलेले अनुदान ६०० वरुन १२०० रुपये करण्यात आले आहे. हे मानधन निश्चितच वाढेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.