Click Here...👇👇👇

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या पतीचा भाजपमध्ये प्रवेश #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase


गडचिरोली:- काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य रुपाली पंदिलवार यांचे पती संजय पंदिलवार यांनी आज (दि. २५) गडचिरोली येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

नागपूर शिक्षक मतदारसंघाचे भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार नागो गाणार यांच्या प्रचारार्थ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज गडचिरोली येथील फंक्शन हॉलमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला.

यावेळी संजय पंदिलवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी खासदार अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी, आ.कृष्णा गजबे, माजी मंत्री अम्ब्रिशराव आत्राम, जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे, जिल्हा महासचिव रवींद्र ओल्लालवार, प्रमोद पिपरे, बाबूराव कोहळे, प्रशांत वाघरे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.

चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी असलेल्या रुपाली पंदिलवार काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य होत्या. अलीकडेच त्यांची मुदत संपली. वर्षभरापूर्वी त्यांना काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष बनविण्यात आले होते. परंतु आज त्यांचे पती संजय पंदिलवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशाची काँग्रेस नेत्यांना कुणकुणही नव्हती. पंदिलवार यांच्या प्रवेशामुळे आष्टी परिसरात काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता आहे. पती भाजपमध्ये गेल्यामुळे रुपाली पंदिलवार कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, रुपाली पंदिलवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, अशी शक्यता भाजपच्या एका नेत्याने व्यक्त केली.