करायला गेला एक अन् झाले काही भलतेच #chandrapur #Bhandara

शेतकऱ्याने पिकावर केली देशी दारूची फवारणी, पण....


भंडारा:- करायला गेले काय आणि वरती झाले पाय' याची प्रचिती भंडारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला आली. लाखनी येथील एका शेतकऱ्याने धानाच्या नर्सरीवर देशी दारूची फवारणी केल्याने पीक झिंगाट झाल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वीच प्रचंड व्हायरल झाले होते.

ही बातमी वाचून आणखी एका शेतकऱ्याने हा प्रयोग केला, मात्र झाले भलतेच. देशी दारूच्या फवारणीने या शेतकऱ्याचे पीक दिवसभरात जळून गेल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे.

काही दिवसांपूर्वी लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील रामदास गोंदोळे या शेतकऱ्याने देशी दारूचा प्रयोग कीडनाशक म्हणून करीत रोपांना रोगमुक्त केल्याचे वृत्त सर्वत्र झळकले होते. हेच वृत्त वाचून आपणही आपल्या शेतात देशी दारूचा प्रयोग करावा, असा मोह भंडारा तालुक्यातील बसोरा गावच्या रवींद्र लुटे यांना झाला.

११ फेब्रुवारी रोजी सकाळी लुटे यांनी त्यांच्या दीड एकर शेतात धान पिकाभोवती देशी दारूची फवारणी केली. मात्र, हळूहळू पीक पिवळे पडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. अगदी २४ तासांत त्यांचे पीक जळून गेले. केवळ वृत्त वाचून केलेला हा प्रयोग त्यांना चांगलाच भोवला. शेतकऱ्यांनी असे प्रयोग करण्याआधी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आता लुटे करीत आहेत.

देशी दारू फवारून एखादे पीक कीटकमुक्त किंवा जोमदार येते या प्रयोगाला वैज्ञानिक आधार नाही, त्यामुळे त्याचा ठोस आधार किंवा परिणाम नाही. अशा प्रयोगाला आम्ही प्रोत्साहन देत नाही. शेतकऱ्यांनी असे प्रयोग करताना स्वतःचे नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. अर्चना कडू यांनी केले आहे.

देशी दारू फवारून एखादे पीक आले असते तर शेतकऱ्यांनी ते नियमित वापरले असते. शिवाय शास्त्रज्ञांनी यावर संशोधन करत त्याची शिफारसही केली असती. शेतकऱ्यांनी कोणतेही प्रयोग करताना त्या परिसरातील वातावरण, त्या वेळेचे तापमान, जमिनीचा पोत अशा सर्व बाबी तपासूनच करायला हवेत, असा सल्ला कृषी तज्ज्ञ सुधीर धकाते यांनी दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत