Top News

दोन जहाल नक्षल्यांना अटक #chandrapur #gadchiroli #arrested


गडचिरोली:- मागील 17 वर्षापासून फरार असलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून या नक्षल्यांच्या नावावर शासनाने 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. फरार असलेल्या या दोन नक्षल्यांना अटक करण्यासाठी गडचिरोली पोलिस मागील एक वर्षापासून त्यांच्यावर पाळत ठेवून होते. अखेर गडचिरोली पोलिसांना यश आले असून त्यांना हैद्राबाद येथून आज, (20 फेब्रुवारीला) अटक केल्याने नक्षल (Naxals) चळवळीला हादरा बसला आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांची नावे शामला ऊर्फ जामनी मंगलु पुनम (35) व दुगे ऊर्फ मधुकर चिनन्ना कोडापे (42) अशी आहेत.

पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली पोलिस दलाचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन झनक व शिवहरी सरोदे यांच्या नेतृत्वात जवानांनी गोपनीयरित्या अभियान राबवून सदर नक्षल्यांना हैद्राबाद येथून सकाळी अटक केली आहे. दुगे कोडापे हा मरपल्ली उपपोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या बस्वापूर ता. अहेरी, जि. गडचिरोली येथील रहिवासी आहे तर शामला पुनम ही बंडागुडम, बासागुडा, जि. बिजापूर (छ.ग.) येथील रहिवासी आहे.


टुगे कोडापे हा अहेरी दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन 2002 पासून सिरोंचा दलममध्ये कार्यत होता. तसेच सन 2006 पर्यंत अहेरी, जिमलगट्टा व सिरोंचा दलममध्ये कमांडर पदावर राहून दलम सोडून फरार झाला होता. त्याच्यावर 9 खून, 8 चकमक, 2 दरोडा, 4 जाळपोळ, 1 खूनाचा प्रयत्न व 1 इतर असे एकूण 25 गुन्हे दाखल आहेत. शासनाने त्याच्यावर 8 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. शामला पुनम ही महिला नक्षली अहेरी दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर आजपर्यंत 1 खून, 5 चमकम, 1 जाळपोळ, 1 दरोडा, व 1 इतर असे एकूण 9 गुन्हे दाखल आहेत. शासनाने तिच्यावर 2 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

शामला पुंगाटी व टुगे कोडापे हे पती-पत्नी असून दोघेही 2006 मध्ये फरार झाले होते. (Naxals) दलम सोडल्यानंतर कुणालाही पत्ता लागू नये म्हणून तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात सतत विविध ठिकाणे बदलवून पोलिस दलास गुंगारा देत होते. तसेच हैद्राबाद येथे स्वतःची ओळख लपवून दुगे कोडापे हा सुरक्षा कंपनीत वॉचमन पदावर काम करत होता तर पत्नी शामला ही एका कारच्या शोरुममध्ये हाऊसकिपिंगमध्ये काम करीत होती. गडचिरोली पोलिस दलास याचा सुगावा लागताच सुमारे एक वर्षापासून त्यांच्यावर गोपनियरित्या पाळत ठेवून दोघांनाही अटक केली.

गडचिरोली पोलिस दलाच्या प्रभावी कारवाईमुळे जानेवारी 2022 ते आतापर्यंत एकूण 64 नक्षल्यांना अटक करण्यात यश आले आहे. सदर कारवाई पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) यतिश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने