Top News

पत्नीची कुऱ्हाडीने हत्या करून पतीची आत्महत्या #chandrapur #murder #suicideनागपूर:- मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या पतीने कुऱ्हाडीने वार करून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने त्याच खाेलीत गळफास लावून स्वत:ला संपविले. ही घटना रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आमडी (ता. रामटेक) येथे गुरुवारी १६ फेब्रुवारीला मध्यरात्री घडली असून, शुक्रवारी १७ फेब्रुवारी सकाळी उघडकीस आली. आराेपी पतीने आत्महत्या केल्याने हत्येचे कारण कळू शकले नाही.

कुसुम मधुकर युवनाती वय ४३ असे मृत पत्नीचे तर मधुकर धोबा युवनाती वय ५३ असे मृत आराेपी पतीचे नाव आहे. दाेघेही सौंसर, जिल्हा छिंदवाडा (मध्य प्रदेश) येथील रहिवासी असून, कामाच्या शाेधात रामटेक तालुक्यात आले हाेते.

चैतराम भालचंद बसोले रा. आमडी, ता. रामटेक हे माेठे दुग्ध व्यावसायिक असून, त्यांच्या मुलाचे रामटेक शहरात दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे दुकान आहे. मधुकर त्यांच्याकडे गुराखी म्हणून वर्षभरापासून काम करायचा. शिवाय, ताे चैतराम बसोले यांच्या मालकीच्या एका छाेट्या खाेलीत एकटाच राहायचा.

मधुकरची विवाहित मुलगी (काेथुळणा, ता. सावनेर) येथे राहत असून, त्याचा मुलगा याच गावात राहायला आल्याने मधुकरची पत्नी कुसुम मुलाकडे काेथळणा येथे राहायची. ती गुरुवारी आमडी येथे आली हाेती. रात्री जेवण झाल्यानंतर त्या दाेघांमध्ये नेमके काेणत्या कारणावरून भांडण झाले, कुणालाही माहिती नाही. मधुकर शुक्रवारी सकाळी कामावर आला नसल्याने चैतराम त्याला बाेलवायला आले हाेते. बराच वेळ दार ठाेठावून आतून प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी दार ताेडले. त्याचवेळी त्यांना कुसुम रक्ताच्या थाराेळ्यात पडून तसेच मधुकर छताला लटकलेल्या आवस्थेत असल्याचे आढळून आले.

माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक शहरातील उपजिल्हा रुग्णालयात आणले. उपविभागीय पोलिस अधिकारी अशित कांबळे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी रामटेक पाेलिसांनी खुनाचा गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.

कुऱ्हाड केली जप्त

मृत मधुकर युवनाती याला दारूचे व्यसन असल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली. दाेघांनी शुक्रवारी रात्री हरभरा भाजून खाल्ला व रात्री साेबत जेवण केले हाेते. त्यानंतरचा घटनाक्रम कुणालाही माहिती नाही. मधुकरची खाेली गावाच्या टाेकावर असल्याने कुणाला ओरडण्याचा आवाजही ऐकायला आला नाही. खाेलीत रक्ताने माखलेली कुऱ्हाड आढळून आल्याने पाेलिसांनी ती जप्त केली. त्याने आधी खून व नंतर आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने