"जया मी जात आहे, मला आणि माझ्या आईला माफ कर" पत्नीला मॅसेज करत तरुणाने संपवलं जीवन #chandrapur #Nagpur #suicide

Bhairav Diwase


नागपूर:- "जया मी जात आहे, मला आणि माझ्या आईला माफ कर", असा पत्नीला ऑडिओ मॅसेज करत एका सराईत गुन्हेगाराने गळफास घेत आत्महत्या केली आहे. नागपूरच्या जरीफटका पोलीस ठाणे परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अकास्मित मृत्यूची नोंद केली आहे.

ऋतिक ठवरे (२२, मिसाळ लेआऊट, जरीपटका) असे मृत युवकाचे नाव आहे. पती ऋतिकची गुन्हेगारांशी संगत असल्याने त्याची पत्नी जया माहेरी गेली होती. तिच्या विरहात ऋतिक याने पत्नीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर ऑडिओ मॅसेज पाठवला. त्यानंतर राहत्या घरी त्याने गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतिक ठवरे हा युवक गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. त्याची काही गुन्हेगारांशी मैत्री होती. काही गुन्ह्यात सहभागी असल्यामुळे त्याला पोलिसांनी एका वर्षांपूर्वी तडीपार केले होते. गेल्या दोन महिन्यांपूर्वी त्याची तडीपारी संपली आणि तो परत नागपुरात आला. त्याचे जया नावाच्या एका युवतीशी प्रेमसंबंध होते. मात्र, ऋतिकची गुन्हेगारांशी मैत्री तिला आवडत नव्हती.

त्यामुळे ती वारंवार गुन्हेगारी प्रवृत्ती सोडण्यासाठी तगादा लावत होती. शेवटी त्याने गुन्हेगारी वृत्ती सोडण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे जयाने ऋतिकशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर महिन्यात दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांचा संसार सुरू होता. यादरम्यान त्याचे काही मित्र त्याला भेटायला येत होते. त्यामुळे ती नाराज होती.

याच गोष्टीवरून दोघांमध्ये १८ फेब्रुवारीला वाद झाला. ऋतिकने जयाच्या कानशिलात मारली. त्यामुळे पत्नीने रागाच्या भरात थेट माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ऋतिकला पत्नीच्या कानशिलात मारल्याचा पश्चाताप झाला. त्याने पत्नीला फोन केला. ती फोन उचलत नव्हती.

दरम्यान ऋतिक पत्नीच्या मैत्रिणीच्या मोबाईलवर "जया मला माफ कर मी चाललो असा ऑडिओ मॅसेज पाठवला. याची माहिती पत्नी जया हिला समजताच तिने घराकडे धाव घेतली. दरम्यान घरातील वरच्या मजल्यावर खिडकीतून पाहिले असता ऋतिकने गळफास घेतल्याचं दिसून आलं. यानंतर तिने या घटनेची माहिती जरीफटका पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.