पोलिसांनी केला घरफोडी गुन्ह्याचा पर्दाफाश #chandrapur #Rajuraराजुरा:- वेकोलिच्या धोपटाळा कॉलनी आणि राजुराच्या जवाहरनगरात झालेल्या घरफोडी व एका चोरीचा राजुरा पोलिसांनी छडा लावला असून, तीन आरोपींना शुक्रवारी मुद्देमालासह अटक केली आहे. आरोपींजवळून चोरीची एक मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे.

धोपटाळा वसाहतीतील सुद्धामणी बोमन्ना विरय्या हे बाहेरगावी गेले होते. ३१ जानेवारीला घरी परतले असता घराचे कुलूप तोडून घरातील ५० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. जवाहरनगर येथील फिर्यादी कोमल प्रवीण राठोड गावावरून ८ फेब्रुवारी रोजी परत आले असता त्यांच्या घराचे कुलूप तोडून सोन्याची पोत, सोन्याचे लॉकेट, चांदीच्या पायपट्ट्या चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. यावरून पोलिस स्टेशन राजुरा येथे गुन्हे नोंदविले होते.

पोलिस तपासात संशयित आरोपी सचिन ऊर्फ बोंडा विलास बक्कल, दीपक ऊर्फ अजय राजपूत (दोन्ही रा. बल्लारपूर) व दशरथ ऊर्फ काली शंकर आत्राम (रा. गडचांदूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी दोन्ही गुन्ह्यांतील कबुली दिली असून, चोरीला गेलेला डेल कंपनीचा लॅपटॉप व सोन्याचे लॉकेट आणि चांदीच्या पायपट्ट्या जप्त करण्यात आल्या आहेत. दुचाकीही जप्त केली. हे वाहन बल्लारपूर येथील आरोपी दीपक ऊर्फ अजय राजपूत याने रामनगर पोलिस - हद्दीतून चोरी केले. रामनगर ठाण्यात मोटारसायकल चोरीला गेल्याबाबत गुन्हा नोंद आहे. कारवाई ठाणेदार योगेश्वर पारधी, उपनिरीक्षक सदानंद वडतकर, यांच्यासह खुशाल टेकाम, किशोर तुमराम, रामराव बिंगेवाड, रवींद्र तुराणकर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत