कन्व्हेअर बेल्टखालील रोलर चोरणाऱ्या चोरट्यांना अटक #chandrapur #Theft #arrest

Bhairav Diwase


चंद्रपूर:- एसीसी ते सिंदोला रोपवे मार्गावरील कन्व्हेअर बेल्टच्या खाली असलेले ३० हजार रुपये किंमतीचे सहा लोखंडी रोलर अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या प्रकरणी घुग्घुस पोलिसांनी तपास करून शनिवारी दोन चोरट्यांना अटक करून मुद्देमाल जप्त केला. मो. समीर रफिक शेख, रा. श्रीराम वॉर्ड, घुग्घुस व सोहन ऊर्फ झाप्या लक्ष्मी कश्यप, रा. शास्त्रीनगर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

वणी तालुक्यातील शिंदोला खाणीतून सिमेंट बनविण्यासाठी लागणारी गिट्टी रोपवे कन्व्हेअर बेल्टने घुग्घुस कारखान्यात येते. ७ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान वर्धा नदीच्या काठावरील राम मंदिरादरम्यान रोपवेचा कन्व्हेअर बेल्ट काम करीत नसल्याची बाब समोर येताच ओएलबीसीच्या कर्मचाऱ्यांनी चौकशी केली असता कन्व्हेअर बेल्टच्या आतील रोलर नसल्याचे आढळून आले.

याची तक्रार घुग्घुस पोलिसांना दिली असता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. नव्यानेच ठाणेदाराची सूत्रे हाती घेतलेले आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे मनोज धकाते, प्रकाश करमे, रणजित भुरसे, नितीन मराठे यांनी तपास करून दोघांना अटक केली.