राप्तीसागर एक्स्प्रेसच्या बोगीतून निघाला धूर! प्रवाशांनी मारल्या उड्या #chandrapurचंद्रपूर:- बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास माजरी जंक्शनवर १२५११ या क्रमांकाची कोचवेल्लीहून गोरखपूर जाणारी राप्तीसागर एक्स्प्रेस धडकताच एका बोगीतून प्रवाशांची आरडाओरड ऐकू येऊ लागली. या ट्रेनच्या एका बोगीमधून धूर निघत असल्याने ट्रेनला आग लागल्याची बोंब सुरू झाली. त्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी लगेच ट्रेन माजरी जंक्शनवर थांबविताच प्रवाशांनी बोगीतून उड्या घेतल्या. यात एका प्रवाशाचा हात मोडला असूून अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे. सुमारे ४५ मिनिटे ही ट्रेन थांबून होती.

राप्तीसागर एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस या मार्गावर धावते. बुधवारी दुपारी ट्रेन भद्रावती स्टेशनवर पोहोचताच एका बोगीतून धूर निघत असल्याचे प्रवाशांना दिसून आले. बोगीला आग लागली असा अंदाज व्यक्त करत बोगीमधील प्रवासी आरडाओरड करू लागले. मात्र तोपर्यंत सदर ट्रेन माजरी जंक्शनला पोहोचली. या वेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी धूर पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ ट्रेन थांबवली. त्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी एकाच वेळी बोगीतून बाहेर पडण्यासाठी उड्या घेतल्या. या चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी जखमी झाले.

कर्मचाऱ्यांची सतर्कता

या वेळी रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना बोगीच्या ब्रेकिंग सिस्टीममधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच त्यांनी अग्निशमन यंत्राद्वारे परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी प्रवाशांनी घाबरून बोगीबाहेर उड्या मारल्याने अनेकजण जखमी झाले.

पाऊण तास ट्रेन माजरी जंक्शनवरच थांबली

सदर ट्रेन ४५ मिनिटे माजरी जंक्शनवर थांबली होती. त्यानंतर काही प्रवाशांना घेऊन ट्रेन पुढे रवाना झाली. मात्र शेकडो प्रवाशांनी त्या ट्रेनने प्रवास न करता माजरी येथून इतर साधनाने आपला पुढील प्रवास केला. रात्री उशिरापर्यंत ही रेल्वे नागपूर स्थानकावर थांबवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.


रेल्वे स्टाफकरिता ही ट्रेन थांबली होती. ट्रेनमध्ये आग लागण्यासारखी अशी कोणतीही घटना घडली नाही. ट्रेनमध्ये ब्रेकडाउनसारख्या छोट्या-मोठ्या घटना घडत असतात.
जलसिंग जाट, स्टेशन मास्टर
माजरी जंक्शन.

ट्रेनच्या बोगीत आग लागली असल्याची ओरड सुरू झाल्याने प्रवाशांनी ट्रेन थांबताच खाली उड्या मारल्या. यामध्ये अनेक प्रवासी जखमी झाले. यात एका प्रवाशाचा हात मोडलेला आहे. घटनास्थळावरून अनेक प्रवासी मिळेल त्या साधनाने निघून गेले.
रविकांत कुशवाहा, ट्रेनमधील प्रवासी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत