भाजपा पदाधिकारी सूरज पेद्दुलवार यांच्या बहिणीच्या लग्न समारंभातील घटना
चंद्रपूर:- लग्नसोहळ्यातून चोरट्यांनी नववधूचे तब्बल २० तोळे सोने लंपास केले होते. ही धाडसी चोरी एका विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने तीन ते चार आरोपींनी केली.
पोलिसांनी या विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्याच्याकडून ९ लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व एक चारचाकी वाहन, असा एकूण १७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मात्र, या चोरीतील चार आरोपी फरार आहेत.
भानापेठ येथील सूरज पेद्दुलवार यांच्या बहिणीचे लग्न नागपूर मार्गावरील शकुंतला लॉन येथे होते. लग्नासाठी आणण्यात आलेले १६ लाख रुपयांचे सोन्या-चांदीच्या दागिन्यांची पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार पेद्दुलवार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली. सदरची चोरी ही धाडसी चोरी असल्याने रामनगर पोलिसांनी पथके तयार करून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, चोरी होऊन दहा दिवसांचा कालावधी झाला तरी, पोलिसांना चोरट्यांचा कोणताही थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, हर्षल एकरे यांनी एका विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. मध्यप्रदेश राज्यातील राजगड जिल्ह्यातील तीन ते चार चाेरट्यांनी या विधिसंघर्षग्रस्त बालकाच्या मदतीने ही चोरी केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
विधिसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेत त्यांच्याकडून ९ लाख २१ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेले चारचाकी वाहन, असा एकूण १७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. अधिकचा तपास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, रामनगर पाेलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वातील पथक करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत