जुन्या पेन्शनसाठी जिल्ह्यातून 20 हजार कर्मचारी संपावर #chandrapurचंद्रपूर:- अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीला घेवून राज्यातील कर्मचारी संघटनेने मंगळवार, 14 मार्चपासून बेमुदत संप पुकारला आहे.

या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय विभागातील सुमारे 17 ते 20 हजार कर्मचारी संपावर गेले आहे. त्यामुळे जिल्हाभरातील शाासकीय कार्यालयात शुकशुकाट होता.

राज्य कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर जाण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. यासंदर्भात राज्याचे सचिव यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकार्‍यांची बैठकसुध्दा झाली. या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचार्‍यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार 14 मार्चला संपाच्या पहिल्याच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील 20 हजाराहून अधिक कर्मचारी संपात सहभागी झाले आहे.

राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्या वतीने कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून सेवा नियमित करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यांसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष झाल्याने राज्य कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल, बांधकाम, कोषागार, पाटबंधारे, वनविभाग, उपनिबंधक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासह 20 हजाराहून कर्मचारी संपात सहभागी झाले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. कार्यालय प्रमुख अथवा एक ते दोन कर्मचारी वगळता संपूर्ण कर्मचारी संपात सहभागी झाले होते. संप टाळण्यासाठी शासनाने संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 'काम नाही तर, वेतन नाही' हे धोरणसुध्दा शासनाने लागू केले आहे. त्यामुळे यावर तोडगा निघणार की, संपात सहभागी झालेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत