राजुरा:- कोळसा खाणीत सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर बंदूक ठेवून चेहऱ्यावर दुपट्टा बांधून आलेल्या चार-पाच अज्ञात इसमांनी तीन ट्रक कोळसा लुटून नेला. ही घटना सोमवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास पोवनी २ कोळसा खाणीत घडली. या थराराने वेकोलि प्रशासनासह वेकोलि कामगारांमध्येही खळबळ उडाली आहे.
बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या पोवनी २ खुल्या कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळशाचे उत्पादन घेतले जाते. ही कोळसा खाण कोळसा उत्पादनात अग्रेसर असल्याने या खाणीतून दिवस-रात्र कोळशाच्या ट्रकांचे आवागमन सुरू असते.
सोमवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास पोवनी २ कोळसा खाणीत जी.एन.आर कंपनीकडून वेकोलिच्या मागील चेक पोस्ट नं.३ वर नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षक नितीन चौधरी व त्यांचा एक साथीदार आपले कर्तव्य चोख बजावीत असताना अचानक एका गाडीतून चेहऱ्यावर दुपट्टा बांधलेले चार- पाच अज्ञात इसम आले. त्यांनी कोळसा खाणीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांच्या डोक्यावर काही कळायच्या आत बंदूक ठेवली. या घटनेने सुरक्षा रक्षक घाबरले.
कोळसा चोरून नेण्यासाठी चोरट्यांनीच ट्रक क्रमांक एमएच ३४ बीजी ९५९५, एमएच ३४ बीझेड ०४३० आणि एमएच ३४ बीजी ६५०० या क्रमांकाचे तीन रिकामे ट्रक आणले व बंदुकीच्या धाकावर ते ट्रक चेकपोस्टच्या आत सोडून तीनही ट्रकमध्ये कोळसा भरून येईपर्यंत चार-पाच अज्ञात इसमांनी सुरक्षा रक्षकांच्या डोक्यावर बंदूक रोखून धरली. ट्रक कोळसा भरून चेकपोस्टच्या बाहेर जाईपर्यंत बंदूकधारी सर्व अज्ञात इसमांनी गाडीतून पोबारा केला. त्यांनतर घाबरलेल्या सुरक्षा रक्षकांनी घडलेली सर्व घटना वेकोलि प्रशासनाला सांगितली.
कोळसा खाणीत घडलेल्या या नाट्यमय थराराने कोळसा खाणीत भीतीचे वातावरण पसरले असून पुन्हा कोळसा खाणींची सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आली आहे. या घटनेची माहिती राजुरा पोलिसांना देण्यात आली आहे. त्यांनी याप्रकरणी अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करून घटनास्थळाचा पंचनामा केला. पुढील तपास सुरू असल्याचे राजुराचे ठाणेदार योगेश पारधी यांनी सांगितले.