Top News

बकरी व शेळी चोरी प्रकरणातील आर्थिक देवाण-घेवाण भोवली #chandrapur #bramhapuri #police


दोन पोलीस कर्मचारी निलंबित


ब्रम्हपुरी:- बकरी व शेळी चोरी प्रकरणात तळोधी बाळापूर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयित आरोपीकडून १५ हजार रूपये घेतले. फिर्यादीसोबत आर्थिक देवाण-घेवाण केल्याने पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. सहायक फौजदार सुरेश पानसे व पोलीस शिपाई मनीष गेडाम अशी निलंबित पोलिसांची नावे आहेत.

तळोधी बा. येथील नवानगर वार्डातील माया बोरकर यांच्या गोठ्यातून दोन बकरे व दोन शेळ्या चोरीला गेल्या. माया बोरकर यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर सहायक फौजदार सुरेश पानसे व शिपाई मनीष गेडाम यांनी संशयित म्हणून अश्विन कचरू मेश्राम या युवकाला पोलिस ठाण्यात आणले. त्याला मारहाण करून प्रकरण दडपण्यासाठी त्याच्याकडून १५ हजार रूपये वसूल केले. त्यापैकी पाच हजार रूपये फिर्यादी माया बोरकर यांना रवी मोटघरे या व्यक्तीच्या माध्यमातून दिले. मात्र तिने हे पैसे दुसऱ्याच दिवशी परत केले.

याप्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते अजित सुकारे यांना मिळताच त्यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक नागपूर तथा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व ब्रह्मपुरी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली. अश्विन मेश्राम या युवकाला विनाकारण मारहाण करून व बळजबरीने १५ हजार रूपये वसूल केल्याने त्यानेही दोघांविरोधात तक्रार केली. शिवाय, फिर्यादी माया बोरकर यांनीही पुन्हा तक्रार केल्यानंतर सहायक फौजदार सुरेश पानसे व पोलिस शिपाई मनीष गेडाम या दोघांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली.अखेर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आल्याने पोलिस अधीक्षक परदेशी यांनी सहायक फौजदार सुरेश पानसे आणि मनीष गेडाम यांना निलंबित केले. या आर्थिक देवाण घेवाण व निलंबनाची पोलीस खात्यात चर्चा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने