तरुणींची छेड काढणाऱ्या मजनूला मिळाली जेलची हवा #chandrapur #bramhapuri

Bhairav Diwase
0


ब्रम्हपुरी:- शहरामधील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणींची छेड काढणाऱ्या एका मजनूला एका तरुणीने धाडस दाखवत पोलिसांच्या ११२ या टोलफ्री क्रमांकावर कॉल केला.

लगेच ब्रह्मपुरी पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधत काही तासांतच मजनूला पकडून गजाआड केले. त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ब्रह्मपुरी वखार महामंडळाजवळून एक तरुणी आपल्या राहत्या घरून कॉलेजकडे जात असताना एका मजनूने तिच्या मागून मोटारसायकलने येऊन तिला अश्लील स्पर्श करून तिची छेड काढली. पीडित मुलगी घाबरून ओरडली असता त्याने पळ काढला; परंतु एवढ्यावरच हा मजनू थांबला नाही. पुढे जाऊन त्याने परत खेड रोडवर दुसऱ्या तरुणीची छेड काढली; परंतु या तरुणीने लगेच स्वतःला सावरून त्याच्या मोटारसायकलचा नंबर लक्षात ठेवला व पोलिसांना ११२ या टोलफ्री क्रमांकावर कॉल केला.

परिवहन ॲपवरून शोधली आरोपीची दुचाकी

ब्रह्मपुरी पोलिसांनी त्वरित हालचाल करून पीडित मुलीशी संपर्क साधला. परिवहन ॲपवरून या मोटारसायकलचा (क्रमांक एमएच ३४ एटी-७१०१) शोध घेऊन आरोपीचाही शोध घेतला. नरेश सुरेश दिवटे (वय २७, रा. पारडगाव, ता. ब्रह्मपुरी) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली. पोलिसी हिसका दाखविताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)