Top News

'माया'साठी रुद्रा-बलराम वाघांत लढाई #chandrapur


चंद्रपूर:- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील 'रुद्रा' व 'बलराम' या दोन वाघांमध्ये लढाई झाली. या लढाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या दोन वाघांची लढाई ही 'माया' वाघिणीसाठी की वर्चस्वासाठी अशी चर्चा पर्यटकांमध्ये रंगली आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी प्रसिद्ध आहे. देश-विदेशातील पर्यटक वाघांचे दर्शन घेण्यासाठी येथे मोठ्या संख्येने येत असतात. ताडोबातील रुद्रा व बलराम या दोन वाघांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू आहे. मागील अनेक दिवसांपासून या दोघांमध्ये ही लढाई सुरू असली,

तरी रविवारी झालेल्या लढाईची समाजमाध्यमावर चर्चा आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मोहर्ली वन परिक्षेत्रातील जंगल परिसरातील कोअर झोनमध्ये बलराम आणि रुद्र या दोन वाघामध्ये ही लढाई झाली. रविवारी सकाळच्या सुमारास ही लढाई ताडोबात आलेल्या अनेक पर्यटकांनाही बघायला मिळाल्याने ते आनंदित झाले.

एका वाघाला जंगलात वावर करण्यासाठी ४० ते ५० चौरस किमी परिसर लागतो, असे अभ्यासकांचे मत आहे. वाघ एखाद्या भागात असेल आणि त्या ठिकाणी दुसरा वाघ त्याच्यावर भारी पडला तर लढाई जिंकणारा वाघ हा त्या परिसराचा राजा असतो. तो त्या परिसरावर आपले वर्चस्व निर्माण करीत असतो. दुसरा वाघ आपले वावर क्षेत्र सोडून दुसरीकडे वर्चस्व निर्माण करीत असतो. तर काही वाघ वाघिणीच्या प्रेमासाठीसुध्दा लढाई करीत असल्याचे वन्यजीव अभ्यासक सांगतात.

कोअर झोनमध्ये असलेल्या ताडोबातील माया वाघिणीचे मन जिंकण्यासाठी बलराम आणि रुद्र यांच्यात लढाई झाली असल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे. या लढाईत बलराम विजयी ठरला असल्याचीही चर्चा आहे. लढाईत दोन्ही वाघ भयंकर जखमी झाले. त्यामुळे बलराम हा ताडोबातील पंचधारा भागात गेला. तर रुद्र येनबोडीच्या दिशेने गेल्याची चर्चा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने