इन्स्टाग्रामवरील मैत्रीतून शारीरिक अत्याचार #chandrapur #nagpur

Bhairav Diwase

पीडितेला बेल्टने मारहाण, सिगारेटचे चटके


नागपूर:- सोशल माध्यमांतून होणाऱ्या मैत्रीतून अनेकवेळा समोरील मुलीला अत्याचारच सहन करावा लागतो व त्याची परिणती आयुष्यभराचे चटके सोसण्यात होते. अशीच एक घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

हेही वाचा:- रक्ताने माखलेली पत्नी, वजनी दगड अन् विषाचा डबा


एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला इन्स्टाग्रामवर झालेल्या मैत्रीत अतिविश्वास ठेवणे महागात पडले. आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले व लग्नासाठी विचारल्यावर बेल्टने मारहाण करत अगदी सिगारेटचे चटके देत तिचा छळ केला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा तर दाखल केला आहे.

अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रशांत परिहार (वय २३, कुंभारटोली, नंदनवन) याच्याशी ओळख झाली. एप्रिल २०२० मध्ये ही ओळख झाली व काही दिवसांतच त्यांच्यात मैत्री झाली. प्रशांतने तिच्यावर प्रेम असल्याचे नाटक केले व विद्यार्थिनी त्याच्या जाळ्यात फसली. त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले व वेळोवेळी तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. 

विद्यार्थिनी त्याला ज्यावेळी लग्नाबाबत विचारायची तेव्हा तो संतापायचा. त्याने संतापाच्या भरात काहीवेळा तिला शिवीगाळ करत बेल्टने मारहाणदेखील केली. तसेच तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके देत जीवे मारण्याची धमकी दिली. २५ एप्रिलपर्यंत हा प्रकार सुरू होता. अखेर तिची सहन करण्याची शक्ती संपली व तिने अजनी पोलिस ठाणे गाठत प्रशांत परिहारविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.