वनपालाने घेतली पाच हजाराची लाच; न्यायाधीशांनी सुनावला पाच वर्षांचा कारावास #chandrapur #pombhurnaचंद्रपूर:- अवैध सागवान प्रकरणात कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वनपालास अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी पाच वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. राजेश ऋषीजी रामगुंडेवार (५०) असे लाचखोर आरोपी वनपालाचे नाव आहे.

पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथे वनपाल राजेश ऋषीजी रामगुंडेवार कार्यरत होते. तक्रारदार यांच्याकडे असलेल्या अवैध सागवानप्रकरणी कारवाई न करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेतली. याप्रकरणी त्याच्यावर मूल पोलिस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालीन पोलिस उपअधीक्षक राजेश शिरसाठ यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. विशेष न्यायालय चंद्रपूर येथे हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले होते.

२४ एप्रिल रोजी या प्रकरणाचा निकाल देताना जिल्हा न्यायाधीश तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांनी सर्व पुरावे तपासून राजेश रामगुंडेवार यांना कलम सातमध्ये दोन वर्षे शिक्षा व २५ हजार दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावास कलम १३ (२) मध्ये ३ वर्षाची शिक्षा व २५,००० रुपये दंड, दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

याप्रकरणी सरकारतर्फे सरकारी वकील ॲड. संदीप नागपुरे यांनी काम पाहिले. या कारवाईसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकनिकर, अपर पोलिस अधीक्षक मधुकर गीते, पोलिस उपअधीक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनात पो. हवा अरुण हटवार यांनी केली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत