(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहाड खुर्द उपवनक्षेत्रातील विरखल चक येथील महिला अंगणात झोपून असतांना मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास अचानक वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली आहे. श्रीमती मंदाबाई एकनाथ सिडाम (53) रा. विरखल चक असे मृतक महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहीतीनुसार, उन्हाळ्याचे दिवस असल्याने ग्रामीण भागातील नागरिक रात्रोच्या सुमारास बाहेर अंगणात झोपत असतात. त्याचप्रमाणे विरखल येथील महिला श्रीमती मंदाबाई एकनाथ सिडाम ह्या अंगणात झोपल्या असतांना मध्यरात्री 2 वाजताच्या दरम्यान त्यांच्यावर वाघाने हल्ला करुन फरफटत नेत असतांना आरडाओरड केली असता घरातील व्यक्ती जागी होऊन आरडाओरड केल्याने वाघ हा त्या महिलेला सोडून जंगलात पसार झाला. मात्र सदर महिलेचा जागीच मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती सावली वनपरिक्षेत्र व पाथरी पोलिसांना देण्यात आली. रात्रीच घटनास्थळ गाठून पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी सावली ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. वनविभाग तर्फे तात्काळ परिवाराला 25 हजारांची मदत करण्यात आली आहे. मात्र वाघाच्या या दहशतीने परिसरात चांगलेच भीतीचे वातावरण पसरले आहे.