रखरखत्या उन्हात आदिवासीचे रास्ता रोको आंदोलन # pombhurna


तीन हजार आंदोलनकर्त्यांची उपस्थिती

निर्णय लागेपर्यंत जागेवरून उठणार नसल्याचा प्रशासनाला इशारा


पोंभूर्णा:- पेसा कायदा,इको सेन्सिटिव्ह झोन,सुरजागड लोह प्रकल्पाची वाहतूक हे प्रमुख मागण्या घेऊन आदिवासी नेते जगन येलके व विलास मोगकार यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना गणतंत्र पार्टी व बहुजन समाजाच्या वतीने आदिवासी समाजाचा मंगळवारला पोंभूर्ण्यातील जुना बस स्थानक चौकात जन आक्रोश,रास्तारोको व ठिय्या आंदोलन करण्यात आले.जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत जागेवरून उठणार नाही असा पवित्राही आंदोलकांनी घेतला असल्याने हे आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.आंदोलनात महिला व चिमुकल्यांची मोठी उपस्थिती होती.


पोंभूर्णा तालुक्यातील ५० टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या आदिवासी बहुल गावांना ५ वी व ६ वी अनुसूची अंतर्गत तात्काळ पेसा कायदा लागू करावा,पोंभूर्णा तालुक्यातील वन जमीनी व महसूल जमीनी वर ५० वर्षापेक्षा जास्त वहिवाट करीत असलेल्या बहुजनांना तात्काळ पट्टे देण्यात यावे,सुरजागड लोह प्रकल्पाचे भरधाव वाहतूक पोंभूर्णा शहरातून बंद करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसह आणखी महत्वाच्या नऊ मागण्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आदिवासी नेते जगन्नाथ येलके व देवाडा खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच विलास मोगरकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.या आंदोलनात चंद्रपुर व गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी व बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता अंदाजे तीन हजाराहून अधिक समाज बांधव या आंदोलनला उपस्थित होते. यावेळी पोलिस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता. तेलंगाणा राज्यातील पारंपारिक ढेमसा नृत्य व घुसाडी नृत्य आंदोलन स्थळी दिवसभर सुरू होते.


जो पर्यंत प्रमुख मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच चालू राहणार असा पवित्रा आंदोलकांनी घेतला असल्याने आंदोलन किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या आंदोलनाला काॅंग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठींबा दिला.यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे, काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नितीन भटारकर यांची उपस्थिती होती.
चार वर्षांपूर्वी पेसा कायद्याच्या संबंधाने जगन येलके यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले होते.त्याच प्रमुख मागणीला घेऊन मंगळवारला भव्य आंदोलन करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने