भामरागड:- सतत रागावत असल्याने बहिणीच्या जावेचा गळा आवळून खून करत नंतर तिचा मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या भासवल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. ही थरारक घटना (मलमपुदुपूर, ता. भामरागड) येथे घडली. एक महिन्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. कल्पना विलास कोठारे (३२, रा.मलमपुदुपूर) असे मृत महिलेचे नाव असून, गुड्डू दशरथ गावडे (२५, रा. इरपनार, ता. भामरागड) हा आरोपी आहे.
एक महिन्यापूर्वी कल्पना यांचा मृतदेह शेतात झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पती विलास यांनी आत्महत्या समजून लाहेरी पोलिस ठाण्यात माहिती दिली; मात्र घटनास्थळी भेट दिल्यावर पोलिसांना वेगळीच शंका आली. शवविच्छेदन अहवालात ही शंका खरी ठरली. कल्पना यांनी आत्महत्या केली नसून त्यांना कोणीतरी संपविल्याचे उत्तरीय तपासणी अहवालातून उघड झाले.
लाहेरी ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला; पण सुगावा मिळत नव्हता. मृत कल्पना यांचा मलमपुदुपूर येथे पोल्ट्री व राइस मिलचा व्यवसाय होता. गुड्डू गावडे हा कल्पना यांच्या धाकट्या जावेचा भाऊ असून, तीन वर्षांपासून तो बहिणीकडेच राहायला होता. पोल्ट्री व राइस मिलच्या कामाचा सारा डोलारा कल्पना सांभाळत. त्यामुळे कामावरून कल्पना या गुड्डूला सतत जाब विचारत. त्याला अनेकदा त्या रागावल्या होत्या. त्यामुळे गुड्डूच्या मनात कल्पना यांच्याबद्दल राग होता. यातून महिनाभरापूर्वी त्याने कल्पना यांच्यावर पाळत ठेवली. रात्री त्या स्वच्छतागृहात जाण्यासाठी जाग्या झाल्या. यावेळी गुड्डूने पाठीमागून जाऊन त्यांचा गळा दाबून खून केला. यानंतर कोणाला शंका येऊ नये म्हणून स्वत:च मृतदेह दोरीने झाडाला लटकावून आत्महत्या केल्याचे भासविले; मात्र पोलिसांनी घटनेचा उलगडा करून खरा आरोपी शोधून काढलाच. पोलिस निरीक्षक संतोष काजळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुड्डू गावडेला उपनिरीक्षक संतोष काजळे, महादेव भालेराव यांनी ताब्यात घेतले. उपनिरीक्षक सचिन सरकटे तपास करत आहेत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत