Top News

चंद्रपुरतील हाजी दादा हासम चिनी अँड सन्स वर दुसऱ्यांदा कारवाई #chandrapur




Google ads.
चंद्रपूर:- शहरातील भानापेठ येथील हाजी दादा हासम चिनी ॲन्ड सन्स या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी दुसऱ्यांदा कारवाई करून २ क्विंटल प्लॉस्टिक जप्त केले आहे. यापूर्वी याच दुकानदारावर ३० मार्च रोजी कारवाई करून १३२५ किलो प्लाॅस्टिक जप्त करून ५ हजारांचा दंड ठोठावला होता. दुसऱ्यांदा साठा आढळल्याने १० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.

महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकाने या व्यावसायिकास सक्त ताकीद दिली आहे. पुन्हा असा गुन्हा केल्यास कडक कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली. मनपा हद्दित प्लॉस्टिक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात आहे. प्लाॅस्टिक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहिती देणाऱ्यास ५ हजारांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. यास मोठा प्रतिसाद मिळून मनपापर्यंत प्लाॅस्टिक साठ्याची गुप्त माहिती पोहोचविण्यात येत आहे.

शहरात वस्तू खरेदी करताना प्लास्टिकची पिशवी देण्यात येते किंवा मागितली जाते. प्लाॅस्टिक पिशवीला पर्याय म्हणून मनपामार्फत विकल्प थैला नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आला. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली. मनपाद्वारे ४० हजार ५५७ कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लाॅस्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली. महाराष्ट्र प्लाॅस्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार ५०० रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड,दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजारांचा दंड आणि तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे.

ही कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त अशोक गराटे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात संतोष गर्गेलवार,भुपेश गोठे, मनीष शुक्ला, राज हजारे, अतिक्रमण पथक व स्वच्छता विभागाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने