Top News

गडचांदुरात बनणार रेल्वेचे गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल; १५ कोटींचा खर्च #railway #chandrapur #Korpana #Gadchandur




Google ads.
कोरपना:- भारतीय रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील गडचांदूर रेल्वे स्थानकावर गती शक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल विकसित करण्याचा रेल्वेने निर्णय घेतला आहे. १५.२० कोटी रुपये खर्चून सदर टर्मिनल बांधण्यात येणार असून यामुळे गडचांदूर शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे. सदर बांधकामाचे टेंडर स्थानिक दालमिया भारत कंपनीला मिळाल्याने लवकरच कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाने तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर स्थानकावर नवीन गती शक्ती मल्टी-मॉडल कार्गो टर्मिनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कार्गो टर्मिनल पूर्णपणे रेल्वेच्या जमिनीवर बांधले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास खाजगी जमिनीचे सुद्धा अधिग्रहण करण्यात येणार आहे. बांधकामाकरिता दालमिया सिमेंट भारत लिमिटेडला १५.२० कोटी रुपयांची निविदा देण्यात आली आहे.

उद्योगांकडून गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने भारतीय रेल्वेने गती शक्ती कार्गो टर्मिनल धोरण सुरू केले आहे. हे टर्मिनल्स रेल्वेद्वारे वाहतुक करण्याची आवश्यकता असलेल्या वस्तूंची रेल्वेद्वारे आयात-निर्यात सुलभ करतील. त्यामुळे सुरक्षित वाहतूक होण्यास मदत होईल. जीसीटीच्या बांधकामामध्ये अतिरिक्त रेल्वे लाईन टाकणे, पृष्ठभागाचे काँक्रिटीकरण, इलेक्ट्रॉनिक वे ब्रिज, हमाली विश्रामगृहाची तरतूद, आच्छादित शेड, अप्रोच रोड, पाणी पुरवठ्याची तरतूद, संगणकीकृत पद्धतीची स्थापना, माहिती प्रणाली, ट्रॅक मॅनेजमेंट सिस्टम, अतिरिक्त लाईनचे विद्युतीकरण, हायमास्ट लाइटिंग अशा अनेक बाबींवर काम होणार आहे.

दालमिया भारत सिमेंटसोबत करण्यात आलेल्या कराराचा कालावधी ३५ वर्षांचा आहे. सोबतच देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सुद्धा दालमिया भारत सिमेंटचीच आहे. ट्रॅक, सिग्नल आणि टेलिकॉम सारख्या मालमत्तेची देखभाल आणि कर्मचारी खर्च रेल्वेकडून केला जाणार आहे. रेल्वेने वाहतूक हा सर्वात सुरक्षित, सोपा आणि सर्वात स्वस्त पर्याय असल्याने चंद्रपूर परिसरात असलेल्या सिमेंट कंपन्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

तेलंगणा राज्याच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूरच्या सभोवताल सिमेंट कारखाने असून सिमेंटची निर्यात व कोळशाची मोठ्या प्रमाणात आयात या भागात होत असल्याने गतिशक्ती कार्बो टर्मिनलची या ठिकाणी आवश्यकता होती. १५.२० कोटी रूपये खर्च करून गडचांदूर रेल्वे स्थानकावर गति शक्ती कार्गो टर्मिनल बांधण्याचा प्रस्ताव प्रत्यक्षात आणल्याबद्दल सिकंदराबाद विभागाच्या रेल्वे अधिकाऱ्यांचे अभिनंदन.

मालवाहतूक होणार मग प्रवासी वाहतुकीचे काय?
रेल्वेने घेतलेला निर्णय गडचांदूर शहरवासीयांसाठी जरी स्वागतार्ह असला तरी कित्येक वर्षापासून सुरू असलेली रेल्वेद्वारे प्रवासी वाहतूक सुरू कधी होतील? हा प्रश्न अजूनही अधांतरी आहे. तसेच दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या गडचांदूर-आदीलाबाद प्रवासी रेल्वेलाईनची अनेक वर्षापासून असलेली मागणी प्रलंबित असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने