टीसी काढण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, दोन आरोपींना अटक #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase
0

गडचिरोली:- दहावी उत्तीर्ण झाल्याने शाळेतून टीसी काढण्यासाठी आलापल्ली येथे आलेल्या एटापल्ली तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर दोन युवकांनी अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी अहेरी पोलिसांनी दोन्ही युवकांना अटक केली आहे. (A minor girl who went to collect TC was assaulted, two accused arrested)

नेहाल श्यामसुंदर कुंभारे (२४, रा. जीवनगट्टा, ता. एटापल्ली) व रोशन विठ्ठल गोडसेलवार (२२, रा. आलापल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी युवकांची नावे आहेत. पीडित मुलगी ही एटापल्ली तालुक्यातील आहे. ती आलापल्ली येथील एका शाळेत शिकत होती. दहावी उत्तीर्ण झाल्याने टीसी काढण्यासाठी १० जून रोजी आलापल्ली येथील शाळेत गेली. टीसी मिळण्यास उशीर लागेल, असे शिक्षकाने सांगितले. त्यामुळे गावाकडे जाण्यास निघाली तेव्हा नेहाल कुंभारे हा दुचाकीने जाताना दिसला. तो ओळखीचा असल्याने पीडित मुलीने त्याला फोन करून बोलाविले. उन्हामुळे चक्कर आल्यासारखे वाटत असल्याने गावाकडे नेऊन दे, अशी विनंती मुलीने नेहालला केली. त्याने आलापल्ली येथील रोशन गोडसेलवार याच्या घरी नेले.

त्या ठिकाणी पाण्याच्या नावावर तिला काही तरी वेगळेच पिण्यास दिले. पाण्याचा वेगळाच वास येत होता, मात्र चक्कर येत असल्याने मुलीने ते पिऊन घेतले. काही वेळातच तिला चक्कर आली व ती बेडवर झोपली असताना रोशन व नेहालने आळीपाळीने अत्याचार केला. पीडित मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चक्कर आली असल्याने तिची शक्ती क्षीण झाली होती. याचा गैरफायदा नराधमांनी घेतला. शुद्धीवर आल्यावर तिला हा प्रकार लक्षात आला. सायंकाळी ती दुसऱ्या मित्राच्या दुचाकीवर गावी पोहोचली. तिने घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.

११ जून रोजी एटापल्ली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. मात्र, घटना अहेरी पोलिस स्टेशनअंतर्गत येत असल्याने सदर प्रकरण एटापल्ली पोलिसांनी अहेरी पोलिसांकडे वर्ग केले. अहेरी पोलिसांनी नेहाल व रोशन या दोघांनाही १२ जून रोजी अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)