भरदिवसा पडलेल्या दरोड्याने जिल्ह्यात खळबळ
सांगली:- सांगलीच्या मिरज रस्त्यावरील मार्केट यार्डजवळील वसंत कॉलनीत रिलायन्स ज्वेल्स हे भव्य शोरूम गेल्या काही वर्षापासून कार्यरत आहे. (They entered the store posing as police, then robbed at gunpoint)
रविवारी दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान शोरूममध्ये दरोडेखोर आतमध्ये आले. त्यानंतर पोलीस असल्याचे सांगून सर्व कर्मचाऱ्यांना एकत्र बोलवले. तपास करणार असल्याचे सांगून सर्वजण एकत्र आल्यानंतर रिव्हॉल्वर बाहेर काढून त्यांच्यावर रोखले. त्यानंतर सर्वांचे हात आणि तोंड चिकट टेपने बांधले.
काहींनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना मारहाणही केली. दोघा कर्मचाऱ्यांना दरडावून सर्व दागिने, रोकड पिशवीत भरण्यास सांगितले. चांदीचे दागिने न घेता केवळ सोन्याचे दागिने, डायमंड्स आणि रोकड दरोडेखोरांनी घेतली.
सीसीटीव्हीचे डीव्हीआर काढून घेतले
दरोडेखोरांनी शोरूमची यापूर्वी पाहणी करून सीसीटीव्ही कॅमेरे असल्याची खात्री केली होती. त्यामुळे चेहरे न झाकताच त्यांनी दरोडा टाकला. जाताना कोणताही पुरावा राहू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे जोडलेले डीव्हीआर मशिनही कर्मचाऱ्यांना सांगून काढून घेतले. गडबडीत एक डीव्हीआर मशिन खाली पडून फुटले. त्यामुळे ते तसेच सोडून दरोडेखोर पळाले. पोलिसांना हे डीव्हीआर मशिन मिळाले असून, त्यातील फुटेजचा शोधले जाणार आहे.
ग्राहकावर गोळीबार
दरोडा टाकल्यानंतर सर्व दागिने लुटले जात असतानाच एक ग्राहक आतमध्ये आला. तो दरोडेखोरांना पाहून पळून जात असताना त्याच्यावर गोळीबार केला. तेव्हा शोरूमची दर्शनी बाजूची काच फुटली. सुदैवाने ग्राहकाला गोळी लागली नाही. परंतु काच लागून तो जखमी झाला. दरोडेखोर दोन मोटारीतून आल्याची तसेच 9 ते 10 जण असल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. ते सर्वजण परजिल्ह्यातील असल्याचे स्पष्ट होत आहे. शोरूमच्या दारातील रस्ता तसेच मिरजेकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्यामुळे दरोडा पडल्याचे तात्काळ कोणाच्या लक्षात आले नाही.
जवळपास 80 टक्के दागिने त्यांनी लांबवले आहेत. एकूण किती मुद्देमाल लांबवला याची माहिती घेण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. तर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तपासाच्या सूचना दिल्या.गुन्हे अन्वेषणची खास पथके तयार करण्यात आली असून ती दरोडेखोरांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत.