यवतमाळ:- आईला का मारता, असे विचारल्याने दारूच्या नशेत तर्रर्र वडिलाने चक्क मुलाच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकल्याची घटना येथील भोसा रोड परिसरात घडली. या प्रकरणी मुलाने वडिलांविरोधात पोलिसांत तक्रार दिली. विक्रांत भरणे (१९) असे जखमी मुलाचे नाव असून, महादेव भरणे असे आरोपी वडिलांचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, महादेव भरणे हा सतत दारूच्या नशेत असतो. त्यामुळे घरी आल्यानंतर त्याचे कुटुंबियांशी वाद होतात. घटनेच्या दिवशी तो दारू पिऊन घरी आला. घरात येताच त्याने पत्नीशी वाद घालून तिला मारहाण सुरू केली. यावेळी घरातच असलेला त्याचा मुलगा विक्रांत याने वडिलांना आईला का मारता, म्हणून जाब विचारला. त्यामुळे पारा भडकलेल्या महादेवने एका शिशीतील ॲसिडसदृश द्रव विक्रांतच्या चेहऱ्यावर फेकले. यात विक्रांतचा चेहरा, गाल, छातीवर आणि डोळ्यांच्या बाजूने भाजल्या गेले. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी विक्रांतला तात्काळ दवाखान्यात उपचारासाठी नेले.
उपचारानंतर विक्रांतने येथील अवधूतवाडी पोलीस ठाण्यात वडील महादेव भरणे याच्या विरोधात ॲसिड हल्ला केल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी महादेव विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.