होर्डिंग लावण्याची जीवघेणी कसरत अंगलट #chandrapur #yawatmal


एकजण तिसऱ्या माळ्यावरून खाली कोसळला, दुसरा विजेच्या धक्क्याने भाजला

यवतमाळ:- जाहिरातीचे फलक लावण्यासाठी इमारतीवर चढलेल्या दोन तरुणांना विजेचा जबर धक्का लागला. त्यामुळे एक युवक तिसऱ्या माळ्यावरून थेट खाली कोसळला तर एकजण गंभीर भाजला गेला. ही घटना दिग्रस शहरातील मानोरा चौकात घडली. रवी बोचरे (४०) व विनोद काळे (३५) दोघेही रा. यवतमाळ अशी जखमींची नावे आहेत.

दिग्रस शहरातील ममता व्यापारी संकुलाच्या तिसऱ्या माळ्यावर हे दोघेही जाहिरातीचे फलक लावत होते. त्यावेळी तरुणांकडील लोखंडी रॉड इमारतीवरून गेलेल्या विद्युत तारांवर गेल्याने विद्युत तारेतून आगीचे गोळे बाहेर पडले. फलक लावणाऱ्या या दोघांना विजेचा जबर झटका बसला. यात विनोद काळे हा तरुण तिसऱ्या माळ्यावरून खाली दुकानाच्या टिनशेडवर पडला. त्या आवाजामुळे नागरिक गोळा झाले तेव्हा ही घटना उजेडात आली. नागरिकांनी दोन्ही जखमींना जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रवी बोचरे याला विजेचा जबर धक्का बसल्याने व आगीच्या ज्वाळांनी त्याच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजल्याने त्याला यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. या घटनेने होर्डिंग लावण्यासाठी कामगार स्वत:च्या जिवाशी खेळ करत असल्याची बाब पुढे आली असून यावर नगर परिषदेने कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत