चंद्रपूर मनपाच्या पथकाने जप्त केले ६२० किलो प्लास्टीक #chandrapur

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल या दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने सोमवारी १९ जुन रोजी दुपारी कारवाई करून ६२० किलो प्लास्टीक जप्त केले आहे. दरम्यान प्लास्टीकचा साठा करणाऱ्या मालमत्ताधारकास ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.

शहरातील स्थानिक भानापेठ येथील शक्ती पान मटेरियल येथे मोठ्या प्रमाणात प्लास्टीक साठा असल्याची माहीती मनपा उपद्रव शोध पथकास मिळाली होती. माहितीच्या आधारे पाहणी केली असता ६२० किलो प्लास्टीक येथे आढळून आले. बंदी असलेल्या प्लास्टीकचा साठा केल्याने सदर माल जप्त करण्यात आला असुन गोडाऊन मालकास ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात १ जुलै २०२२ पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना २०१८ नुसार पाचशे रुपये जागेवरच दंड, संस्थात्मक पातळीवर ५ हजार रुपयांपर्यंत दंड, दुसऱ्यांदा वापर केल्यास १० हजार रुपये, तर तिसऱ्यांदा गुन्हा केला तर २५ हजार रुपये दंड आणि ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशवीला पर्याय म्हणुन मनपामार्फत विकल्प थैला नागरीकांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत ७२३ दुकानदारांनी विकल्प थैलाच्या वापरास सुरवात केली असुन मनपाद्वारे ४२६६७ कापडी पिशव्यांचे वितरण करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)