गडचिरोली:- आठ फूट लांबीचा एक अजगर कोंबड्याची शिकार करून पोलिस ठाण्यात पोहोचला. जणू त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली. या अजगराने नंतर पोटातील कोंबडा तोंडातून बाहेर काढला. सिरोंचा तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील दुर्गम भागातील पोतागुड्डम पोलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला.
सिरोंचापासून सात किलोमीटरवर पोतागुड्डम गाव आहे. या गावातील पोलिस ठाण्याच्या आवारात अजगराने प्रवेश केला तेव्हा त्याचे पोट सुजलेले होते, त्यामुळे त्याला नीट सरपटता येत नव्हते, त्याच्यातील स्थूलपणा पाहून त्याने काही तरी गिळल्याचे दिसत होते. आठ फूट लांबीच्या या अजगराने काही वेळात पोटातील कोंबडा हळूहळू पुढे सरकवत तोंडातून बाहेर काढला. हा कोंबडा मृतावस्थेत होता. यानंतर पोलिस अंमलदार गौतम गवई यांनी अजगराला सुरक्षित जंगलात सोडले.