Top News

पदवीचा निकाल लागेना, तलाठी अर्ज भरता येईना; अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची अवस्था? #Chandrapur #Gadchiroli

चंद्रपूर/गडचिरोली:- चार वर्षांनंतर राज्यात महसूल विभागांतर्गत तलाठी (गट क) संवर्गातील एकूण ४६४४ जागांसाठी भरतीची प्रक्रिया शासनाने सुरू केली आहे. त्यात पदवी प्राप्त उमेदवारांनी अर्ज करण्याची अट घातली आहे. पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा निकाल अद्याप लागला नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांना या भरतीसाठी अर्ज करता येत नसल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाचे निकाल लवकर लावण्याची आग्रही मागणी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केली आहे.

कोरोनामुळे सलग दोन शैक्षणिक वर्षांचे वेळापत्रक बिघडले. त्यामुळे पदविका, पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांच्या सत्रांमध्ये देखील बदल झाला. यावर्षी उन्हाळी सत्रातील परीक्षा विद्यार्थी आणि पालकांच्या मागणीनुसार गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने नियोजित वेळापत्रकानुसार सुरू केल्या. पण, अद्याप पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्या दरम्यान, सरळ सेवेतील तलाठी पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याची अट घालण्यात आली आहे. त्यामुळे चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना या पदासाठी अर्ज करणे अडचणीचे ठरत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १७ जुलैपर्यंत आहे. ते लक्षात घेवून गोंडवाना विद्यापीठाने पदवीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचे निकाल लवकर जाहीर करणे आवश्‍यक आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने