शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट, दोन नक्षत्र संपले तरी पावसाचा पत्ताच नाही #chandrapur

Bhairav Diwase
0
शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे

चंद्रपूर:- दोन नक्षत्रे संपले असून पावसाचा पत्ताच नसल्याने भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.

तालुक्यात जून अखेरीस पावसाने हजेरी लावली होती. परंतु गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी पुरक झालेल्या पावसामुळे पेरणी केली आहे. परंतु पावसाच्या लहरीपणामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट आवासुन उभे राहिले आहे. यंदा बिपरजॉय चक्रिवादळामुळे मान्सूनने पाठ फिरवल्याने पाऊस लांबला आणि खरिपातील पिके सुकू लागली. यामुळे शेतकऱ्यांपुढे पिके वाचण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे. पावसाने विशेष करून तालुक्यात उशिराने हजेरी लावल्यामुळे व मान्सून उशिरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबणीवर गेल्या. मागील आठवड्यात हलक्याशा पावसाच्या सरी आल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता व पेरणीला सुरुवात केली होती.

शेतकऱ्यांची पेरणी संपताच पावसाने मात्र गेल्या आठवड्याभरापासून दडी मारली आहे. मध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, पण पावसाने पुन्हा विश्रांती घेतली. सध्या शेतातील पिकांचे कोंब निघाले असून ते उन्हामुळे कोमेजले आहेत. कापूस सोयाबीन व चारा पिकांची लागवड झाली असून दिवसभर पावसाळी वातावरण असते, पण पाऊस पडतच नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. अधूनमधून पावसाच्या बारीक सरी दाखल होतात पण त्याचा उपयोग होत नाही. कडक उन्हात पिके सुकू लागली आहेत.

  गेल्या चार-पाच दिवसांपासून वेगाने वारे वाहत आहेत. हे वारे पाऊस आणतात की येणाऱ्या पावसाचे ढग पळवितात याबाबत शंका आहे. प्रचंड वेगाने वारे वाहू लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भरच पडत आहे. जिल्ह्यात बहुतांश गावांमध्ये पाऊस झाला नाही. शेतातील बांधालासुद्धा पाणी तुंबलेले नाही. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खड्ड्यांमध्ये अजूनही पाणी साठले नाही.गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला होता. यंदा तुलनेत पावसाचे प्रमाण कमी आहे. चांगल्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे म्हणजे जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल आणि पिकेही वाचतील. परंतु अजूनही जिल्ह्यातच जोरदार पाऊस झालेला नाही. तालुक्यातील सर्व भागात पावसाने सुरुवातीला चांगले मनावर घेतले होते. पण पुढे मात्र पाठ फिरवली. आता तर सर्वत्र पिकांची अवस्था वाईट होत चालली आहे. ज्या ठिकाणी विहीर आहे तेथे स्प्रिंकलरने पाणी दिले जात आहे. मात्र ज्या ठिकाणी ही सोय नाही ती पिके अडचणीत आली असून त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)