अल्पशिक्षित असून सुद्धा गावाच्या विकासासाठी झटणारा ध्येयवादी सरपंच धनराज उर्फ बंडू भाऊजी बुरांडे #chandrapur #pombhurna #article

Bhairav Diwase
0
....अल्पशिक्षित आयुष्य असलं तरी गावाच्या भल्यासाठी झटणारा ध्येयवादी सरपंच धनराज उर्फ बंडू भाऊजी बुरांडे. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील रहिवासी असा साधा सरळ परिचय.घरची हलाखीची परिस्थिती व घरात अठरा विश्वे दारिद्र्य असल्याने मनात शिक्षण घेण्याची इच्छा असतांनाही अवघं ७ वी पर्यंतचंच शिक्षण त्यांना घेता आलं. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने पोटापाण्याचा प्रश्न म्हणून पुढे ते कमी वयातच मोलमजुरी करू लागले. एवढंच काय तर गाई-म्हशी राखण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं. कसा बसा त्यांचा राहाट गाडा चालू लागला.

गावातल्या सडक निर्माण कामावर मजूर म्हणून काम केले. व पुढे चालून ते अश्याच रोडच्या माती व मुरूम कामाचे पेटी कांन्ट्रक्ट घेऊ लागले यात त्यांची बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती सुधारली. या साऱ्यात त्यांना सामाजिक कामाची मोठी आवड होती. गावातील कोणत्याही उपक्रमात ते सहभागी व्हायचे. कुणाला काही अडचण पडली, कुणाला आरोग्याची समस्या निर्माण झाली की धनराज उर्फ बंडू बुरांडे हे नेहमीच पुढाकार घेत. कित्येक अपघातातील लोकांना बंडू बुरांडे यांनी दवाखान्यात दाखल केले आहे. कुणी गावातील माणूस आजारी पडलं की त्याला दवाखान्यात नेण्यासाठी त्यांचा पुढाकार नेहमीच असतो. याच सामाजिक कार्यामुळे गावात त्यांना मान सन्मान मिळू लागला. त्यांनी बरेच गाव विकासाचे काम गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू केले यात ते सफलही झाले.

महाराष्ट्र शासनाने २००७ मध्ये महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान हे गावातील लोकांना भांडणापासून व पर्यायाने गुन्ह्यांपासून परावृत्त करणे यासाठी अस्तित्वात आणले होते. हा महाराष्ट्र शासनाचा अधिकृत प्रकल्प होता. १५ ऑगस्ट २००७ साली या योजनेची सुरुवात झाली.यात धनराज उर्फ बंडू बुरांडे हे अवघ्या २७ वर्षात तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून पद भुषविले. आणि त्यांनी सामाजिक सलोखा राखण्यासाठी गाव एकत्रीत केले. या कार्यकाळात त्यांनी नवनवीन उपक्रम हाती घेतले. यात पहिला उपक्रम त्यांनी हाती घेतला तो म्हणजे गावातील एका घटस्फोटीत महिलेसोबत एका विधूर पुरूषासोबत त्यांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिला अगदी थाटामाटात. याच दरम्यान अत्यंत गरिब घरच्या दोन निराधार मूलींचाही लग्न होतकरू मुलांसोबत लावून देत सामाजिक कार्य केले. हा वेगळेपणा पाहून अनेकांनी त्यांच्या कामाची प्रशंसा केली.यापुढे जाऊन त्यांनी तंटामुक्तीचे काम सशक्त करता येईल यासाठी त्यांनी ग्रामसुरक्षा दलाची स्थापना केली.दलाचं काम म्हणजे कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ग्राम सुरक्षा दल सदैव तत्पर असायचे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांचा पुढाकार व पोलिस प्रशासनाला सहकार्य नेहमीच असायचा त्यामुळे याची सर्वत्र चर्चा होऊ लागली. याची दखल घेत प्रशासनाने आदर्श अध्यक्ष तंटामुक्त पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हि घोडदौड सुरू असतांनाच त्यांनी राजकारणात प्रवेश घेतला तो म्हणजे भाजपात. सामान्य कार्यकर्ता म्हणून ते आपले पक्षाचे काम सुरू केले.पक्षाने सांगितलेले काम त्यांनी निस्वार्थपणे करू लागले. त्यांची ओळख पक्षश्रेष्ठींना कळली. व पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवून काही प्रमुख पदांवर त्यांची निवड केली. हे सुरू असतांनाच २०१४ मध्ये संयुक्त वन संरक्षण समितीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. पहिले काम म्हणून त्यांनी वृक्ष संवर्धनाचे व्यापक काम हाती घेतले.

जामखुर्द निसर्गरम्य परिसरात त्रिव्हेणी नदीच्या संगमावर असलेल्या शंभू पहाडीवर असलेल्या पंधरा हजार "काऱ्या रुकाच्या" झाडांच्या संवर्धनासाठी त्यांनी विशेष उपाययोजना केल्या आणि म्हणूनच ते झाडं शाबूत राहीलीत. आज शंभू पाहाळ "काऱ्या रुकाच्या" मौल्यवान झाडांने बहरलेला आहे.हा परिसर तसा ऐतिहासिक महत्त्व लाभलेला आहे त्याला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे.त्यामुळेच येथील भागाचा विकास व्हावा व येथील वनसंपदेचे जतन करता यावे तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकास व्हावा यासाठी बंडू बुरांडे यांनी जामखुर्द येथील त्रिवेणी संगम परिसरातील जंगलाला वनपर्यटन तिर्थक्षेत्र म्हणून विकास व्हावा यासाठी वनविभाग व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत मागणी केली आहे.जर या क्षेत्राला वनपर्यटनाचा दर्जा मिळाल्यास येथील विकास होईल हा दृढ विश्वास धनराज बुरांडे यांना आहे.ते पुर्ण करण्यासाठी त्यांची धडपडही सुरू आहे.वनव्यवस्थापन समितीच्या वतीने व्यापक वृक्षरोपण केल्या गेले.यात आजपर्यंत ५० हजाराहून अधिक वृक्षलागवड करण्यात आली आहे.आज जे झाडं जगले आहेत त्यांचेकडे पाहून समाधान वाटते.झाडं फक्त त्यांनी जगवली नाहीत तर त्यांच्या सांभाळासाठी ते अतोनात प्रयत्न केले.मजल दर मजल प्रगतीचा आलेख उंचावत राहिला.

अश्यातच ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावाचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी आली. बंडू बुरांडे यांचेवर पक्षानेही विश्वास ठेवला. व २०१९ मध्ये बंडू बुरांडे जामखुर्द ग्रामपंचायतच्या सरपंचपदी विराजमान झाले.गावाच्या विकासासाठी जे जे संभव होते ते त्यांनी पुढाकार घेऊन केले आहे.यात एक महत्वाचा टप्पा राहिला तो कोरोनाकाळ. योग्य ती खबरदारी घेत गावाला कोरोनापासून दूर ठेवलं.

बंडू बुरांडे सरपंच म्हणून त्यांच्या कारकिर्दीतील एक उपक्रम अत्यंत महत्त्वाचं आहे. ग्रामपंचायत अंतर्गत रोहयोचे कामे सुरू आहेत.यात वृक्षलागवड व संवर्धनासाठी काही महिलांना मजूर म्हणून कामावर ठेवण्यात आले आहे.यात काही नवल नाही असंच काहीसं वाटून जाईल पण सरपंच बंडू बुरांडे यांनी एक ठराव घेत गावातील गंगा भागीरथी,परितकत्या या महिलांना वर्षभर काम मिळेल याची तरतूद केली.आज या महिला ग्रामपंचायतीकडून मिळणाऱ्या रोजगारावर स्वाभिमानान आपलं व आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करीत आहेत.खरं तर नवरा मेलेल्या एखाद्या महिलेच्या आसवांची किंमत आपण ठरवूच शकत नाही. पण जामखुर्द ग्रामपंचायतने एक पाऊल पुढे टाकत गरजू महिलांना आत्मनिर्भर आयुष्य जगण्यासाठी चालणा दिली आहे त्यांना आत्मनिर्भर आयुष्यासाठी सहकार्य करीत आहेत.काहीं महिलांनी तर याच मिळकतीतून आपल्या मुलांचा शिक्षण पुर्ण करीत त्यांना एखादं अधिकारी बणवण्याचा स्वप्न पाहत आहेत.भिकेचं ढोबर घेऊन कुणासमोर हात पुढे करण्यापेक्षा स्वाभिमानाने ते जगत आहेत.

बंडू बुरांडे यांच्या उपक्रमाचे व जामखुर्द ग्रामपंचायतचे ते मनस्वी आभार मानत आहेत.सरपंच धनराज उर्फ बंडू बुरांडे यांनी सुरू केलेला उपक्रम व दुरदृष्टी पाहिली की आश्चर्य वाटतं की अवघं ७ वी चं शिक्षण घेणारं हा ध्येयवादी सरपंच इतकं ब्राड विचार कसं काय करू शकतो. याचं आश्चर्य वाटतं व नवलही वाटतं इतकंच नव्हे तर अभिमानही वाटतं.अगदी अलीकडचा एक उपक्रम अत्यंत महत्त्वाचाच जुनी पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला होता.यात जिल्हा परिषद शिक्षकही त्या संपात सहभागी झाले होते.त्यामुळे शाळा कुलूपबंद झाल्या होत्या.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सरपंच बंडू बुरांडे यांनी गावातील उच्चशिक्षित तरुणांना विद्यादानाबद्दल विचारणा केली व संपाच्या काळात विद्यार्थ्यांसाठी कुलुपबंद शाळा उघडून शिक्षण देण्यात पुढाकार घेतला. या कामात स्वतःच्या मुलालाही कामात लावले होते. अल्पशिक्षित असून सुद्धा गावाच्या विकासासाठी झटणारा ध्येयवादी सरपंच धनराज उर्फ बंडू भाऊजी बुरांडे हा खरंच ग्रेट वाटतो. सरपंच धनराज उर्फ बंडू भाऊजी बुरांडे यांचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे....‌

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)