विश्रामगृहातून उलगडणार चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास:- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार #chandrapur

Bhairav Diwase

नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन

चंद्रपूर:- नवीन शासकीय विश्रामगृहाच्या माध्यमातून चंद्रपूरचा वैभवशाली इतिहास उलगडणार असल्याची माहिती राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. नवीन विश्रामगृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.


या कार्यक्रमाला आमदार सुधाकर अडबाले, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे , सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, कार्यकारी अभियंता (विद्युत) पुनम वर्मा, उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, भूषण येरगुडे, शाखा अभियंता श्रीकांत भट्टड, राखी कंचर्लावार, ब्रिजभुषण पाझारे, सुभाष कासनगोट्टूवार यांची प्रमुख उपस्थिती होती. ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूरात सार्वजनिक बांधकाम विभागाचे आकर्षक विश्रामगृह तयार होत आहे. या नवीन विश्रामगृहात चंद्रपूरची ऐतिहासिक पार्श्वभुमी उभी करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये देखील विश्रामगृहाचे आकर्षण असेल. विकासाच्या बाबतीत चंद्रपूर जिल्हा कायम पुढे राहावा, याच संकल्पनेतून नाविन्यपूर्ण कामे करण्याचे नियोजन आपण करीत आहोत.’

नवीन विश्रामगृहाची वैशिष्ट्ये...

विश्रामगृह परिसरात नवीन विश्रामगृहाचे बांधकाम व अस्तित्वात असलेल्या विश्रामगृहाची दुरुस्ती करणे व पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे, ही कामे होणार आहेत. नव्याने साकारण्यात येणाऱ्या विश्रामगृहाकरिता १६ कोटी ८९ लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सध्याच्या विश्रामगृहाच्या बाजुला दोन मजली अतिविशिष्ट व्यक्तींकरिता बांधकाम करण्यात येत आहे. तळमजल्याचे क्षेत्रफळ १३९४ चौ.मी. असून पहिल्या मजल्याचे क्षेत्रफळ ९५३.४० चौ.मी. आहे. तळमजल्यावर सहा व्हीआयपी सुट, मिटींग हॉल, डायनिंग हॉल व पहिल्या मजल्यावर चार व्हीआयपी सूट आणि मिटींग हॉल आहे. हे बांधकाम १५ महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात येईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

शाळांमधील सुविधा वाढणार

जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे अद्यावतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री श्री. मुनगंटीवार यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये संरक्षण भिंत, पिण्याचे स्वच्छ पाणी तसेच इतर सोयीसुविधा उत्तमोत्तम करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. यासाठी निधीची कमतरता मुळीच पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

विकासकामे अन् योजना

- अडीच वर्षे रखडलेले चंद्रपूर बसस्थानकाच्या कामाला वेग
- ताडोबा परिसरातील बसस्थानकांवरील सुविधांमध्ये वाढ
- बाबुपेठ येथे गोंडवाना विद्यापीठाचे उपकेंद्र
- सोमनाथ येथे कृषी महाविद्यालय प्रस्तावित
- चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये जलसंधारणाची होणार कामे
- या कामांसाठी अर्थसंकल्पात होणार ४०० कोटींची तरतूद
- नोवल टाटाकडून जिल्ह्यासाठी १० कोटींचा सीएसआर निधी प्रस्तावित